आजकाल अनेक लोक YouTube वर काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. काही यूट्यूबर चांगले व्हिडीओ देखील शूट करतात, मात्र काही लोक नको ते स्टंट करुन व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करतात. शिवाय असे स्टंट करण्यासाठी ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणांचा वापर करतात. ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय यूट्यूबरच्या अशा कृतींमुळे सरकारी मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. अशा घटनांचे अनेक व्हिडीओ तुम्ही याआधाही पाहिले असतील. अशातच आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक यूट्यूबर रेल्वे रुळावर नाग गोळी फटाके पेटवताना दिसत आहे. शिवाय या फटाक्यांमधून निघणारा धूर एवढा विषारी आहे की, शेजारच्या रुळावरुन जाणाऱ्या रेल्वेमधील प्रवाशांवरही त्याचा परिणाम होत आहे. यूट्यूबरच्या या विचित्र कृतीची रेल्वे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, यूट्यूबर रेल्वे रुळाच्या मधोमध नाग गोळी पेटवताना दिसत आहे. त्याने नाग गोळी पेटवताच हवेत मोठ्या प्रमाणात प्रदुषित धूर पसरताना दिसत आहे. यूट्यूबर व्हिडिओमध्ये सांगत आहे की, तो नाग गोळी पेटवत आहे आणि त्यातून किती धूर निघत आहे. यूट्यूबर हा व्हिडीओ शूट करत असतानाच जवळून एक रेल्वे जात असल्याचंही दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विषारी धुरामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. शिवाय रेल्वेला आग देखील लागू शकते. हा व्हिडिओ राजस्थानमधील जयपूरमधील दंत्रा स्टेशनजवळील असल्याचा सांगण्यात येत आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या यूट्यूबरला नको त्या ठिकाणी व्हिडीओ शूट करणं चांगलचं महागात पडू शकतं.
पाहा व्हिडीओ –
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
यूट्यूबरने रुळावर फटाके पेटवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं, “अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई करायली पाहिजे”, दुसऱ्या एकाने यूजरने लिहिलं, “हे लोक सर्वाधिक प्रदूषण पसरवत आहेत.” तर तिसऱ्याने लिहिलं, “लाईक्ससाठी हे लोक काहीही करतात.”