मुंबईतले रिक्षाचालक म्हणजे मुजोर अशी तक्रार नेहमीच केली जाते. रिक्षाचालक म्हटले की त्यांच्या नावाने बोट मोडली जातात. पण सर्वच रिक्षाचालक सारखे नसतात आणि त्यांच्यातही माणूसकी असते हे शुक्ला नामक रिक्षाचालकाने सिद्ध करुन दाखवले आहे. मुंबईकर रझीम शेख यांना हा अनुभव आला असून पाकिट विसरल्याने रझीम शेख यांच्याकडून एका रिक्षाचालकाने पैसे तर घेतले नाहीच उलट परत जाण्यासाठी त्या रिक्षाचालकाने रझीम शेख यालाच पैसे देऊ केले होते.
रझीम शेख यांनी फेसबुकवर रिक्षाप्रवासादरम्यान आलेला अनुभव शेअर केला आहे. ‘मी शुक्रवारी मशिदीत नजाम अदा करण्यासाठी घाईघाईतून ऑफीसमधून निघालो होतो. या घाईगडबडीत मी पाकिट घ्यायला विसरलो आणि रिक्षेत बसलोदेखील’ असे रझीम शेख पोस्टमध्ये सांगतात. पाकिट विसरल्याचे लक्षात येताच रझीम शेख यांनी रिक्षावाल्यालाही घडलेला प्रकार सांगितला. नमाज संपेपर्यंत मशिदीबाहेर थांबा. नमाज संपल्यावर आपण ऑफीसमध्ये परत जाऊ आणि तिथे तुमचे पैसे देतो अशी विनंती रझीम यांनी त्या रिक्षाचालकाला केली. पण त्या रिक्षाचालकाने ऐवढा वेळ थांबणे शक्य नाही असे सांगितले. तुम्ही देवाकडे जात आहात. पैसे नसले तरी चालतील तुम्ही चिंता करु नका असे त्याने रझीम यांना सांगितले. तो रिक्षाचालक यावरच थांबला नाही. त्याने रझीम यांना स्वतःकडील पैसे देऊ केले आणि ऑफीसमध्ये परतण्यासाठी तुम्हाला हे पैसे कामी येतील असे सांगितले. रिक्षाचालकाने दाखवलेली माणूसकी बघून रझीम यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रिक्षाचालकाचा फोटो काढला आणि त्यांचा मोबाईल नंबरही घेतला.
रिक्षाचालकाचे नाव शुक्ला असून त्याच्या रिक्षेवर गणपतीचा फोटो आणि कपाळावर टीळा होता असे रझीम यांनी पोस्टमध्ये आवर्जून नमूद केले. विशेष म्हणजे याबाबतीत आपण काही मोठे काम केल्याचे शुक्ला यांना वाटले नाही असेही रमीझ यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. रमीझ यांनी फेसबुकवर अपलोड केलेली पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत असून त्या रिक्षाचालकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा