शाळेत ससा आणि कासवाची गोष्ट न ऐकलेला क्वचितच एखादा सापडेल. कासवासारखी हार न मानता शर्यंत जिंकण्याची शिकवण या गोष्टीने आपल्याला दिली. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही गोष्ट. कासवला कमी लेखून पुढे निघालेला ससोबा ‘कासव काय शर्यत पार करणार?’ असे म्हणून  झोपून जातो आणि जेव्हा सशाला जाग येते तेव्हा मात्र कासव शर्यत जिंकलेला असतो. ही झाली पुस्तकातली गोष्ट पण अशीच खरी शर्यत तुम्हाला पहायला मिळाली तर.. ?
थायलंडच्या ‘पेट एक्स्पो’मध्ये काही दिवसांपूर्वी ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत लावली. शेकडो वर्षांपासून वाचण्यात आलेल्या गोष्टींमध्ये नेहमी कासवच शर्यत जिंकतो. त्यामुळे पेट एक्स्पोमधल्या ससा कासवाच्या शर्यतीत नक्की कोण जिंकेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. गोष्टीत सांगितल्याप्रमाणे कासव जिंकतो की आता ही शर्यत ससा जिंकतो हे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. कासव आणि सशाला शर्यत रेषेवर उभे करण्यात आले. थोड्याच वेळात शर्यत सुरू होते. सगळ्यांची उत्सुकता ताणली जाते. विशेष म्हणजे गोष्टीप्रमाणे शर्यतीच्या सुरूवातीला ससा धावत पुढे जातो. पुढे गेल्यावर ससा मध्येच थांबून राहतो. मागून हळूहळू येणारा कासव शर्यत पारही करतो. अगदी गोष्टीत वाचतो तशीच ससा कासवाची ही शर्यत रंगते. गेल्याच आठवड्यात या शर्यतीचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आला त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानिमित्ताने गोष्टीत वाचलेल्या ससा कासवाच्या शर्यतीचा किस्सा प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता आला.