पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सोशल नेटवर्किगवर हा सोहळ्यासंदर्भातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. मात्र त्याचबरोबर या सोहळ्यानंतर आणखीन एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून हिंदू राष्ट्र साकारण्याच्या कामात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता यासंदर्भात थेट सकरकारच्या पत्रसूचना विभागालाच (पीआयबी) याबद्दल खुलासा करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे ही अफवा

पीआयबीने व्हायरल होणाऱ्या खोट्या पत्राचा स्क्रीनशॉर्ट पोस्ट केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी पत्रामधून योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केल्याचे सांगितले जात आहे. “ही आहे मोदी सरकारची चाल आणि चरित्र. या पत्राला शक्य तेवढं व्हायरल करा, केवळ भारतात नाही तर परदेशातही हे पत्र व्हायरल झालं पाहिजे,” अशा कॅप्शनसहीत ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. मोदींनी योगींना लिहिलेल्या या पत्राखाली मोदींची सही आणि माथळ्यावर राजमुद्रा असल्याचे दिसत आहे. या पत्रामध्ये मोदींनी, “हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये तुम्ही आणि तुमच्या टीमने दिलेल्या योगदानाबद्दल तुमचे अभिनंदन करत मी पत्राची सुरुवात करतो. राम मंदिराच्या उभारणीमधील महत्वाचा टप्पा ठरलेल्या गोष्टीं पूर्ण होण्यासाठी तुमच्या टीमध्ये ठाम भूमिका घेत काम केल्याबद्दल हिंदू बांधव तुमचे सदैव आभारी राहतील. यामुळे हिंदू राष्ट्राचा नवा इतिहास लिहिला जाईल. २०२२ च्या निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा. मंदिराच्या बांधकामासाठी मी ५० कोटींचा निधी देत आहे,” असं लिहिल्याचा दावा करण्यात येत आहे.

पीआयबीचे स्पष्टीकरण

व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआय़बी फॅक्ट चेक’ नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात थेट सरकारकडूनच स्पष्टीकरण दिलं जातं. याच अकाऊंटवरुन ही व्हायरल पोस्ट शेअर करण्यात आली असून ही अफवा असल्याचे सांगण्यात आलं आहे. “एका फेसबुक युझरने एक पत्र पोस्ट केलं असून हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र हे पत्र खोटं आहे,” असं पीआयबीने म्हटलं आहे.

अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात आल्यानंतरही अफवा पसरवण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीय. देशातील अनेक ठिकाणी पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर येणाऱ्या माहितीची सत्यता पडताळूनच ती शेअर करा असं आवाहन पोलीस त्यांच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटच्या माध्यमातून करत आहे.