अनेकदा गोष्टी इतक्या चुकीच्या घडतात की आपण त्याची कल्पनाही केलेली नसते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वन्यजीव उद्यानात अस्वलांसाठी सफरचंद फेकण्याऐवजी पर्यटक चुकून आपला आयफोन फेकून देतो. चीनमध्ये ही घटना घडली आहे. पर्यटक आपला आयफोन फेकून देत असताना कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल होत आहे.

७ फेब्रुवारीला चीनमधील जिआंगसू प्रांतातील यानचेंग वन्यजीव उद्यानात ही घटना घडली. सीजीटीएनने फेसबुकवर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत व्यक्ती आपला आयफोन अस्वलांसमोर फेकून देताना दिसत आहे. स्कायवॉकवर फिरत असताना व्यक्तीने आपला आयफोन फेकून दिला. खरंतर त्याला अस्वलांना खाण्यासाठी सफरचंज आणि गाजरं फेकायची होती. पण चुकून त्याने आयफोन फेकून दिला.

आयफोन फेकल्यानंतर अस्वलांनाही थोड्या वेळासाठी काहीतरी खायला मिळालं आहे असं वाटतं आणि वास घेण्यास सुरुवात करतात. यानंतर एक अस्वल आयफोन तोंडात उचलून घेतो आणि तेथून निघून जातो. आता आपला आयफोन परत मिळणार नाही असंच त्या पर्यटकाला वाटलं असावं. पण उद्यानातील कर्मचाऱ्यांनी मदत करत आयफोन पुन्हा मिळवून दिला.

Story img Loader