रॅपिडो कंपनी अॅपवर आधारित बाइक, कॅब्स, टॅक्सी, रिक्षाद्वारे ग्राहकांना सेवा पुरवते. रॅपिडोची ही सेवा भारतातील अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक, प्रवाशांचा विचार करून या सेवेचे दर ठरविण्यात आले आहेत. आज सोशल मीडियावर रॅपिडोशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे प्रवाशाला त्याच्या पत्त्यावर पोहोचवणाऱ्या रॅपिडो चालकाची बाइक वाटेत बंद पडते आणि प्रवासी बाइकवरून न उतरण्यावर अडून बसतो.
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून एक व्हिडीओ समोर आला आहे. इथे एका प्रवाशाने रॅपिडो कंपनीची अॅपवर आधारित दुचाकी बुक केली होती. रॅपिडो चालक प्रवाशाला पिकअप करण्यासाठी आला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. पण, ग्राहकाला त्याच्या पत्त्यावर पोहोचवण्याआधीच पेट्रोल संपतल्याने दुचाकी बंद पडते. तर यादरम्यान प्रवाशाने दुचाकीच्या चालकास मदत केली की नाही हे तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…वाघिणीचा सहा बछड्यांसह हृदयस्पर्शी फोटो व्हायरल; वन अधिकारी पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘मेहनती आई’
पोस्ट नक्की बघा…
वाहनातील पेट्रोल संपलेय हे पाहून मदत करण्याऐवजी प्रवाशाने दुचाकीवरून उतरण्यास नकार दिला. त्यामुळे रॅपिडो चालकाने प्रवाशासह दुचाकी स्वतःच धक्का मारत पेट्रोल पंपापर्यंत नेली. व्हायरल व्हिडीओत प्रवासी दुचाकीवर बसला आहे आणि चालक बिचारा एकटाच दुचाकीस धक्का मारताना दिसतो आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला.
“मी बुकिंगसाठी पैसे दिले आहेत. मी पायी चालणार नाही.”
“मी दुचाकीवरून जाण्यासाठी पैसे दिले आहेत; चालण्यासाठी नाही. मी खाली उतरणार नाही,” असे त्याने रॅपीडो चालकास सांगितले असे सांगण्यात येत आहे. दुचाकीचालकाने अनेक विनंत्या केल्या; मात्र त्यानंतरही ग्राहक तयार न झाल्याने चालकाने त्याला बसवूनच दुचाकी पेट्रोल पंपापर्यंत ढकलत नेली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @hemakaroonya1 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रवाशाची वागणूक पाहून नेटकरी कमेंट्समध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.