प्रत्येक व्यक्तीला आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची सवय असते. अनेकजण या दिवशी नवीन कपडे घालून देवदर्शनाला जातात, तर काहीजण आपला वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांसोबत साजरा करतात. एकंदरीत काय तर वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्याप्रमाणे कोणी हॉटेल, रेस्टरंटमध्ये तर कोणी घरीच वाढदिवस साजरा करतात. पण एखाद्या व्यक्तीने त्याचा वाढदिवस स्मशानात जाऊन साजरा केल्याचं तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.
आणखी वाचा- नशिबाचा खेळ! नवऱ्याने लॉटरीत जिंकलेले एक कोटी घेऊन बायकोचा पोबारा; प्रियकराकडे गेली अन्…
शिवाय वाढदिवसासारखा शुभदिवस स्मशानासारख्या अशुभ ठिकाणी जाऊन कोणी का साजरा करेल? असा प्रश्न देखील तुम्हाला पडेल. मात्र, ठाण्यातील एका पठ्ठ्याने आपला वाढदिवस थेट स्मशानात जाऊन साजरा केला आहे. गौतम रतन मोरे (५४) असं स्मशानात वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. गौतम यांचा १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्यांनी त्यांचा वाढदिवस चक्क स्मशानात जाऊन साजरा करण्याचं ठरवलं होतं.
त्यानुसार त्यांनी तो साजराही केला. एवढंच नव्हे तर त्यांनी स्मशानात पार्टी देखील केली. जवळपास १०० माणसांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या वाढदिवसाचा केक कापला आणि त्यानंतर सर्वांनी त्याच ठिकाणी बिर्याणीवर ताव मारला. आश्चर्याची बाब म्हणजे स्मशानातील पार्टीला लहान मुलं देखील उपस्थित होती.
‘…म्हणून स्मशानात वाढदिवस साजरा केला’ –
स्मशानात वाढदिवस साजरा करणाऱ्या गौतम यांनी आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा का केला? याचं कारण देखील सांगितलं, ते म्हणाले, “लोकांच्या मनामध्ये काही अंधश्रद्धा असतात त्या दूर करण्यासाठी आणि स्मशानात भूत-प्रेत असं काहीही नसतं हा संदेश देण्यासाठी मी स्मशानात वाढदिवस साजरा केला” असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मोरे यांच्या वाढदिवसाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.