सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत, थंडीमध्ये आंघोळीचा अनेकांना कंटाळा येतो. आंघोळ नव्हे तर काही लोक तर थंडीच्या दिवसांमध्ये पाण्यात हात घालणंही टाळतात. अशा थंडीच्या वातावरणातही काही लोक तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी जात असतात. शिवाय तीर्थक्षेत्रांच्या ठीकाणी नद्या असतात. त्या नद्यांमध्ये आंघोळ करण्याची लोकांची इच्छा असते पण थंडीमुळे ते पाण्यात जाण्याचं धाडस करत नाहीत. मात्र, नदीमध्ये आंघोळ केल्याने आपल्याला पुण्य मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा असते.
श्रद्धेपोटी लोक काहीही करायला तयार होतात याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. सध्या लोकांना श्रद्धेपोटी आणि पुण्य मिळवण्यासाठी आंघोळ करण्याचा सल्ला देणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्यक्ती लोकांना त्यांच्या नावाची स्वत: आंघोळ करुन पुण्य मिळवून देतो असं सांगत आहे. शिवाय इतरांच्या नावाने पाण्यात डुबकी मारायचा दरही त्याने ठरवला आहे. त्यामुळे लोक पैसे कमावण्यासाठी काय डोकं लावतील याचा अंदाज लावणं कठीण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
हेही पाहा- Christmas 2022 : ख्रिसमस कार्डवर पठ्ठ्याने छापलं असं काही ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
या व्यक्तीची विचित्र बिझनेस आयडीया लोकांना खूप आवडली आहे. विशेषतः त्याच्या मार्केटिंग करण्याच्या स्टाइलची अनेकांना भुरळ पडली आहे. हा मजेदार व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “प्रॉक्सी डुबकी, १० रुपये प्रति डुबकी!” व्हिडिओत एक व्यक्ती नदीत बांधलेल्या स्टीलच्या बॅरिअरवर बसून मोठ्याने ओरडताना दिसतं आहे. तो लोकांना ‘डुबकी घेण्याचे पुण्य घ्यायचे असेल पण थंडीमुळे जर तुम्हाला ते जमत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा’ असं सांगत आहे.
शिवाय तो ज्या माणसाच्या नावाने डुबकी घेईल त्यासाठी लोकांनी १० रुपयांची फी द्यावी लागेल आणि पैसे दिल्यानंतरच आपण डुबकी मारणार असल्याचंही तो सांगत आहे. त्यामुळे आपणाला पैसे मिळतील आणि लोकांना पुण्य मिळेल, असा युक्तीवाद तो करत आहे. अनेकांनी या व्यक्तीची टिंगल केली आहे तर काही लोकांना त्याची कल्पना आवडली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला ३३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने ‘हा व्हिडिओ म्हणजे भारतात बेरोजगारी किती प्रमाणात पसरली आहे हे दाखवतो.’ तर दुसऱ्याने ‘व्यावसायिकांची बुद्धी कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते ते पाहा’ अशी कमेंट केली आहे.