रेल्वे अपघात रोखण्यासाठी एका व्यक्तीने जखमी पायाने तीम किमी धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा पुजारी यांनी दाखवलेल्या धैर्यामुळे अनेकांचे प्राण वाचवले आहेत. कृष्णा पुजारी कर्नाटकचे रहिवासी असून रोजंदारीवर काम करतात. घटना समोर आल्यानंतर कृष्णा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा पुजारी यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. यामुळे डॉक्टरांनी त्यांना रोज सकाळी चालण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंग वॉक करत असतानाच रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि जखमी पायाने धाव घेत त्यांनी मोठी दुर्घटना टाळली.
‘मी रोज सकाळी शक्यतो दोन किमी चालतो. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी ट्रॅकजवळून जात असताना तडा गेला असल्याचं दिसलं. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ याची कल्पना दिली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं’, असं कृष्णा पुजारी यांनी सांगितलं आहे.
कृष्णा पुजारी यांच्या पायाला आधीच जखम झाली आहे आणि त्यात अशा परिस्थितीत धावणं जखम अजून गंभीर करण्याची भीती होती. मात्र तरीही अनेकांचा जीव धोक्यात असल्याने कृष्णा पुजारी यांनी जखमी पायाने धाव घेतली. जवळपास तीन किमी धावल्यानंतर जवळच्या रेल्वे कार्यालयात ते पोहोचले. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना ट्रॅकला तडा गेल्याची माहिती दिली.
‘माझ्या पायाला प्रचंड वेदना होत आहेत. पण मी लोकांचा जीव वाचवू शकलो याचा आनंद आहे’, असं कृष्णा पुजारी यांनी सांगितलं आहे. कृष्णा एका फूट स्टॉलवर काम करतात. औषधांचा खर्च त्यांना परवडत नाही. डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला असतानाही धावल्यामुळे त्यांच्या औषधांचा खर्च वाढणार आहे. मात्र तरीही त्यांनी याची काळजी न करता माणुसकीची धाव घेतली.
कृष्णा यांनी माहिती देताच अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत घटनास्थळी धाव घेतली. त्या मार्गाने जाणाऱ्या दोन ट्रेन थांबवण्यात आल्या. यापैकी एक सात किमी अंतरावर इंद्राली रेल्वे स्थानकावर तर दुसरी 16 किमी अंतरावर पदुबिद्री रेल्वे स्थानकावर होती. रेल्वे रुळ दुरुस्त झाल्यानंतर ट्रेन सोडण्यात आल्या. कृष्णा यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या या शौर्याला सलाम.