सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु आहे, त्यामुळे अनेक राज्यात शरीर गोठवणारी थंडी पडली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणी स्वेटर घालत आहे, तर कोणी ठिकठिकाणी शेकोटी पेटवत आहे. तर काही लोक उबदार कपडे आणि शालचा वापर करुन थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सध्या सोशल मीडियावर एका व्यक्तीने थंडीपासून स्वत:च रक्षण करण्यासाठी असा जुगाड केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं.
खरं तर, आजकाल अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे जुगाड तयार करत असतात. यातील काही जुगाड हे लोकांची अवघड कामे सोपी करण्यासाठी केले जातात, तर काही जुगाड केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने केले जातात. अशा जुगाडांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थंडीपासून बचाव करण्यासाठी असा विचित्र जुगाड केला आहे, जो पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अनेक चादरी अंदावर घेऊन झोपल्याचं दिसत आहे. परंतु चादरीच्या ढिगाऱ्याखाली श्वास गुदमरला जाऊ नये, यासाठी त्याने एक जुगाड केला आहे. व्हिडीओत नीट पाहिल्यानंतर दिसत आहे की, त्याने या चादरांच्या खाली त्याच्या आकाराचे एक बॉक्स तयार केले आहे. ज्यामध्ये तो निवांत झोपला आहे. शिवाय या बॉक्सला एक झाकण देखील बसवण्यात आलं आहे. जे तो आतमध्ये जाताच लावून घेतो.
या विचित्र जुगाडाचा व्हिडीओ @TheFigen नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत तब्बल १० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर ३७ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “खरच भाऊ, खूप थंडी आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “नवीन वर्षापर्यंत याला आणखी चादरी लागू शकतात.”