गुजरातमध्ये ज्याप्रमाणे इतर लग्नं पार पडतात त्याचप्रमाणे हेदेखील लग्न होतं. नवरामुलगा शेरवानी घालून घोड्यावर रुबाबात बसला होता. डोक्यावर फेटा, गळ्यात लाल आणि पांढऱ्या गुलाबानी तयार केला हार आणि समोर मित्र, नातेवाईकांचा डान्स सुरु होता. एक दिवस आधी परंपरेप्रमाणे संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रमही पार पडला होता. पण यावेळी फक्त एक गोष्ट नव्हती ती म्हणजे नवरीमुलगी.

२७ वर्षीय अजय बारोत मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे. अजयला नेहमीच आपलं लग्न व्हावं असं वाटायचं. इतर लग्नांमध्ये गेल्यानंतर तो नेहमी आपलं लग्न कधी होणार अशी विचारणा करायचं असं कुटुंबीय सांगतात. अजयला इतरांप्रमाणे शिक्षण मिळू शकलं नाही. अशिक्षित असल्या कारणाने त्याच्यासाठी मुलगी मिळणं कठीण असल्याची कल्पना त्याच्या कुटुंबीयांना होती. त्याचे वजील विष्णुभाई बारोत गुजरात राज्य परिवहन विभागात कंडक्टर म्हणून काम करत.

‘माझा मुलगा मानसिकदृष्ट्या सक्षम नसून लहानपणीच हे आम्हाला कळलं होतं. लहानपणी त्याने आपल्या आईलाही गमावलं होतं. इतर लग्नांमध्ये वरात पाहिली की त्याला प्रचंड आनंद व्हायचा. यावेळी तो आपलं लग्न कधी होणार असं सारखं विचारत राहायचा. त्याच्यासाठी मुलगी शोधणं कठीण असल्या कारणाने आम्ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसे’, असं अजयच्या वडिलांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे.

‘कुटुंबातील इतर सदस्यांशी चर्चा केल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. लग्नाच्या निमित्ताने मोठी वरात काढायचंही ठरवलं. माझ्या मुलाचं स्वप्न मी पूर्ण करु शकलो याचा खूप आनंद आहे. समाज काय विचार करेल याची चिंता नाही’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

कुटुंबाने ८०० लोकांच्या जेवणाची सोय केली होती. यासाठी एक हॉलही बूक करण्यात आला होता. यासाठी एकूण दोन लाखांचा खर्च करण्यात आला. अजयला संगीत आणि नाचण्याची प्रचंड आवड आहे असं त्याचे काका कमलेश सांगतात. ‘गावातील प्रत्येक लग्नाला तो हजर असतो. फेब्रुवारीत माझ्या मुलाचं लग्न पाहिल्यानंतर अजय नेहमी त्याच्या लग्नाबद्दल विचारायचा. जेव्हा माझ्या भावाने ही संकल्पना मांडली तेव्हा आम्ही सर्वांनीच पाठिंबा दिला’, असं त्यांनी सांगितलं आहे.