सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल होतात. एखाद्या व्यक्तीच्या चेह-यावरील हावभाव टिपलेला फोटो आणि त्यावर विनोदी वाक्य टाकून बनवलेली इमेज म्हणजे मीम. अभिनेते, अभिनेत्रींच्या चेह-यावरील हावभाव असलेले मीम तर यात जास्तच प्रसिद्ध आहे. अशा मीममध्ये एका लहान मुलाचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी या पाच वर्षांच्या मुलाच्या फोटोवर अनेक विनोदी वाक्य टाकून ते फोटो व्हायरल केले. या फोटोमध्ये दिसणारा छोटा मुलगा नक्की कोण हे कोणालाच माहित नव्हते. पण या मुलाचे मीम जेव्हा एका फोटोग्राफरने पाहिले तेव्हा या मुलाचे सत्य त्यांनी जगासमोर आणले.
२०१५ मध्ये कार्लोस कॉर्टीस नावाच्या छायाचित्रकारने त्याचा फोटो काढला होता. अमेरिका सोडून आपल्या मायदेशी घानामध्ये परतलेल्या एका चित्रकारावर तो माहितीपट बनवत होता. या चित्रकाराच्या शाळेत त्याने या लहानग्याचे छायचित्र टिपले होते. गरिबी आणि शिक्षणाचा पुरेसा प्रसार न झाल्याने येथील अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना शिकवण्याचे काम अदुफ् हे चित्रकार करतात. त्यांच्या शिकवणीत असंख्य मुलं येतात. जेव्हा या छायाचित्रकाराला आपण काढलेले छायाचित्र व्हायरल होत असल्याचे समजेल तेव्हा त्याने GoFundMe नावाचे पेज तयार केले. मीमद्वारे व्हायरल झालेला हा मुलगा कोण आहे याबद्दलची माहिती त्यांनी जगासमोर आणली. तसेच त्याच्यासारख्या शिक्षणासाठी धडपडत असलेल्या असंख्य मुलांना आर्थिक मदत करण्याचे आवाहनही त्यांनी सोशल मीडियाद्वारे केले. अनेकांनी त्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या मुलाच्या एका मीममुळे असंख्य मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली.