मागील काही दिवसांपासून देशभरात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं नाव सोशल मीडिया, टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कारण धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नागपूर येथे प्रवचनासाठी आले असता त्यांच्या चमत्कारिक शक्तींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिलं होतं. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण महाराजांना चमत्कारिक शक्ती जाहीरपणे सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं, अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल असंही अनिसकडून सांगण्यात आलं होतं.
दरम्यान, श्याम मानव आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच होता. अशातच काही हिंदुत्ववादी संघटनांनी या वादात उडी घेतल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला होता. शिवाय धीरेंद्र कृष्ण महाराजांनी दिव्यशक्ती आणि चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास ३० लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हानही श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री यांना दिले होते.
हेही पाहा- शाळेत घेऊन जाणाऱ्या आईवर रुसला आणि चक्क स्कुटीवर मांडी घालून बसला, Video पाहून पोट धरून हसाल
तेव्हापासून आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे नाव सोशल मीडियावर चर्चेत आहे. शिवाय त्यांचे दररोज नवे आणि जुने व्हिडीओ व्हायरल होत असून लोकांनाही त्यांच्याबद्दलची माहीती जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता धीरेंद्र कृष्ण महाराजांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
धीरेंद्र कृष्ण महाराजांची तुफान फटकेबाजी –
व्हिडिओमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना आहे, पण सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. या व्हिडीओत धीरेंद्र कृष्ण शास्त्री भक्तांसमोर हातात बॅट घेऊन खेळताना दिसत आहेत. एका व्यक्तीने धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या दिशेने चेंडू टाकताच त्यांनी तो जोरदार फटकावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय त्यांची ही फटकेबाजी बघून उपस्थित लोक टाळ्या वाजवत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
हेही वाचा- धीरेंद्र शास्त्री महाराजांमुळे चर्चेत आलेली सुहानी शाह कोण आहे? अनेक सेलिब्रिटीही करतात फॉलो
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “गुरुदेव पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा फडकावण्यासाठी मैदानात उतरले आहेत. सर्व सनातनींनी जय श्री राम लिहून हिंदुत्वाचे जोरदार समर्थन करावे. जय बागेश्वर धाम, जय गोविंदा.” हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.