एका नऊ वर्षाच्या मुलाने विना तिकीट ३२१८ किमीचा विमान प्रवास केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्राझीलमध्ये राहात असलेल्या इमॅन्युएल मार्केस डी ऑलिव्हेरा याने हा प्रवास करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांना चकवा देण्यात यशस्वी झाल्याने सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. घटनेच्या दिवशी, इमॅन्युएल घरी झोपला होता. त्यानंतर तो तेथून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. शोधाशोध केल्यानंतर अखेर कुटुंबियांनी मॅनॉस शहरात हरवल्याची नोंद केली. या दरम्यान इमॅन्युएल विमानाने देशभरात दोन हजार किमीचा प्रवास करत होता.
“मी पहाटे ५.३० वाजता उठले आणि त्याच्या खोलीत गेले. तेव्हा तो सामान्यपणे झोपलेला होता. त्यानंतर मी झोपी गेले. दोन तासानंतर म्हणजेच ७.३० वाजता पुन्हा खोलीत जाऊन बघितले तर तो तेथे नव्हता. तेव्हा मला जास्तच धास्ती वाटू लागली”, असं इमॅन्युएलच्या आईनं सांगितलं. या दरम्यान इमॅन्युएल घरातून बाहेर पडला आणि जवळच्या विमानतळावर पोहोचला होता. जिथे तो विना तिकीट विमानात चढला. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इमॅन्युएलने सुरक्षारक्षकांची नजर चूकवून विमानात कसे जायचे, याबाबतची माहिती गुगलवरून मिळवली होती. इमॅन्युएल सर्वप्रथम मानाऊ येथून वायव्य ब्राझीलकडे गेला. त्यानंतर साओ पाउलोला गेला. इमॅन्युएलने विमानाने ३२१८ हजार किमीचा प्रवास केला. इमॅन्यएलला आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना भेटण्यासाठी साओ पाउलोला जायचं होतं. म्हणून त्याने असं केल्याचं तपासात समोर आलं आहे.
दुसरीकडे कोणताही प्रवासी कागदपत्रे आणि कोणतेही सामान नसताना हा मुलगा विमानात कसा गेला? याचा तपास मनौस विमानतळ व्यवस्थापन करत आहे. स्थानिक पोलिसांनी विमानतळावर सुरक्षा कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे.