सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओत जंगलाशी संबंधित व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अनेक वन्यजीव अभ्यासक जंगलातील विविध प्राणी आणि झाडांचे फोटो आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. यावेळी त्यांना अनेकदा मोठ्या संकटांचा सामनादेखील करावा लागतो. सध्या अशाच एका वन्यजीव अभ्यासकाचा व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तो जंगलात एका ठिकाणी व्हिडीओ शूट करीत असतानाच त्याच्या अंगावर वीज पडल्याचं पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एव्हरग्लेड्स सिटी, फ्लोरिडा येथे तो वन्यजीव अभ्यासक व्हिडीओ शूट करीत असताना घडली आहे. ‘फॉक्स न्यूज’च्या रिपोर्टनुसार ही घटना मागील आठवड्यात घडली जेव्हा ३५ वर्षीय फॉरेस्ट गॅलेंट दक्षिण फ्लोरिडामध्ये त्याच्या यूट्युब चॅनेलसाठी व्हिडिओ शूट करीत होता. यावेळी अचानक त्याच्या शेजारी वीज कोसळली, त्या वेळचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये फॉरेस्ट गॅलेंट गुडघाभर पाण्यात उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी तो कॅमेऱ्याकडे तोंड करून जंगलातील माहिती देताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो, “आम्ही काही चांगले शॉट्स घेत आहोत. सुंदर दिवस आणि स्वच्छ पाणी आहे. सर्व काही छान चाललं आहे.” तो व्हिडीओत हे सर्व बोलत असतानाच विजेचा कडकडाट झाल्याचं ऐकू येतं आणि क्षणात तो ज्या ठिकाणी उभा आहे, तिथेच मोठा प्रकाश पडतो आणि कॅमेराही हलू लागतो. कॅमेरा हलल्यामुळे काही ऐकू येत नाही. पण तो, “मला मार लागला, गंभीर जखम झाली”, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे.
या घटनेनंतर, गॅलेंटने सांगितले की, अचानक एक मोठा गडगडाट झाला आणि मोठा प्रकाश पडला. परंतु, माझं कॅमेऱ्याकडे तोंड असल्यामुळे मला काही दिसलं नाही; पण मला पाय जड झाल्यासारखं वाटत आहे आणि मला अक्षरशः अर्धांगवायू झाल्यासारखा भास होत आहे. दरम्यान, गॅलेंटने सांगितले की, या घटनेत त्याला आणि त्याच्या टीमला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांना या घटनेनंतर थोडा त्रास जाणवत आहे, तसेच घसा कोरडा पडल्यासारखं वाटत आहे.