आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण वेगवेळे स्टंट करत असतात. शिवाय ज्या लोकांना स्टंट करण्याची आवड असते ते इतरांपेक्षा वेगळा आणि धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण कधीकधी हे लोक असे काही जीवघेणे स्टंट करतात जे पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. सध्या अशाच एका व्यक्तीने केलेल्या भयानक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका उंच इमारतीच्या छतावर एक व्यक्ती उभा असल्याचं दिसत आहे. तो इमारतीच्या रेलिंगवर उभा असताना छतावरून दिसणारे रस्त्याचे दृश्य खूप भयानक वाटत आहे. शिवाय एवढ्या उंचीवरून अनेकांना खाली बघायला ही भीती वाटू शकते अशा ठिकाणी हा व्यक्ती अत्यंत आरामात उभा राहून एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारताना दिसत आहे. यावेळी चुकून जरी पाय घसरला तर तो सरळ खाली पडू शकतो. शिवाय रस्ता आणि इमारतीमधील अंतर पाहता या व्यक्तीने किती मोठा धोका पत्करला आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या उंचीवर हा व्यक्ती बिनधास्त आणि आरामात स्टंट करताना दिसत आहे.
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हा माणूस एका इमारतीच्या रेलिंगवरून दुसऱ्या इमारतीच्या रेलिंगवर उडी मारत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती दिसत नाहीये. हा धक्कादायक आणि भयानक स्टंटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोलियनस्की नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या अकाऊंटवरती आणखी असे बरेच स्टंटचे व्हिडीओ आहेत. त्यामुळे हा व्यक्ती स्टंट करण्याचा रोज सराव करत असून त्याला असे स्टंट करण्याची सवय असल्याचं दिसत आहे. परंतु असे स्टंट करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्याचा प्रकार असल्याच्या कमेंट्स नेटकरी व्हिडीओवर देत आहेत. तर अनेकजण त्याच्या धाडसाचं कौतुक देखील करत आहेत.