‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण सध्या व्हायरल होत असलेल्या एका कुत्र्याच्या व्हिडीओला लागू होत आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याच्या पिल्लाचा असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल यात शंका नाही. व्हिडीओतील कुत्रा एका कारच्या इंजिनमध्ये अडकला होता आणि जवळपास ३० मैलाचा प्रवास त्याने अडकलेल्या स्थितीमध्ये केल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून सुदैवाने काही लोकांनी या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढलं आहे. कुत्र्याच्या पिल्लाला वाचवल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कारच्या इंजिनमध्ये अडकला होता कुत्रा-
कारच्या इंजिनमध्ये अडकलेल्या या कुत्र्याने तब्बल ३० मैलांचा प्रवास केल्याचं सांगितल जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने अडकलेल्या स्थितीमध्येच हा प्रवास केला. हा कुत्रा इंजिनच्या डब्यात चढला, पण त्याला बाहेर निघण्याचा रस्ता सापडला नाही. गाडीच्या ड्रायव्हरलाही इंजिनमध्ये कुत्रा अडकल्याची माहिती नव्हती. त्यामुळे त्याने कॅन्सस ते मिसौरी असा सुमारे ३० मैलांचा प्रवास पूर्ण केला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, या कुत्र्याच्या पिल्लाला एका डिजिटल रिपोर्टरने आणि कॅन्सस सिटी रॉयल्सच्या होस्ट कॅरी गिलास्पीने यांनी पाहिलं. गाडीतून येणारा आवाज ऐकून त्यांनी तपासणी केली असता इंजिनमध्ये कुत्रा अडकल्याचे समजलं.
कुत्र्याचा जीव वाचवला-
कारच्या इंजिनमध्ये कुत्रा अडकल्याचं समजताच कारचे मालक अॅशले न्यूमन यांना पार्किंगमध्ये बोलावण्यात आले आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर कुत्र्याला बाहेर काढलं. कुत्र्याला पाणी पाजून आवश्यक उपचार केल्याचंही व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. सध्या बॉनबॉन नावाच्या या कुत्र्याला कॅन्सस सिटी पेट प्रोजेक्टमध्ये नेण्यात आले आहे.