घरात एखादा कार्यक्रम असल्यास लहान मुली असो किंवा स्त्रिया आवर्जून हातावर मेंदी काढतात. कोणाला हातभर; तर कोणाला अरेबिक मेंदी काढायला जास्त आवडते. मेंदीची पाने वाटून जो मेंदीचा कोन तयार केला जातो, त्याद्वारे मेंदी हातावर काढण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण, आजकाल बाजारात अनेक टॅटू फॅशनच्या मेंदीसुद्धा उपलब्ध असतात. भारतात आणि परदेशांतही अनेकांना मेंदी काढून घेण्यास खूप आवडते. तर याचसंबंधित सोशल मीडियावरील एक पोस्ट समोर आली आहे; ज्यात एका महिलेच्या मुलीने हातावर टॅटूची मेंदी काढली आणि होत्याचे नव्हते झाले.
बाजारात मेंदी काढणाऱ्या अनेक व्यक्ती स्टॉल लावून बसतात आणि तुम्ही त्यांच्याकडून मेंदी काढून घेता. पण, बऱ्याचदा घर आणि ऑफिस अशा कामांतून वेळ काढून, मेंदी काढण्यासाठी एकदोन तास देणे अनेकांना शक्य नसते. तसेच लहान मुलेसुद्धा इतका वेळ मेंदी काढताना स्थिर बसत नाहीत. म्हणूनच बरेच पालक स्टिकरच्या मेंदी लहान मुलांना लावताना दिसून येतात. ज्या एखाद्या टॅटूप्रमाणे दिसतात. तर, सोशल मीडियावरही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.
युनायटेड किंग्डम (UK)मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. किर्स्टी न्यूटन ही महिला तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेली होती. ते एका हॉटेलवर वस्तीसाठी थांबले होते. त्यादरम्यान त्यांच्या मुलीने पायावर काळ्या शाईच्या मेंदीच्या टॅटूने एक फुलपाखराचे चित्र काढून घेतले. नंतर सुटीवरून ते घरी आल्यावर मेंदी टॅटूमुळे त्या लहान मुलीला एक आठवड्यानंतर अॅलर्जी झाली आणि तिने काढलेला टॅटू लालसर दिसू लागला. त्यानंतर मुलीला खाज येऊ लागली आणि तिच्या पायाची आग होऊ लागली. त्यामुळे आई त्वरित मुलीला रुग्णालयात डॉक्टरांकडे घेऊन गेली. ज्या दिवशी मुलीने टॅटू मेंदी काढली त्या दिवशी ती अगदी व्यवस्थित होती; पण सुटीवरून घरी आल्यावर एक आठवड्याने मुलीच्या पायावर अॅलर्जी झाली, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा… तुम्हीही हेल्दी समजून “ब्राउन ब्रेड” खाता? ‘हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल…नागरिकही संतापले
पोस्ट नक्की बघा :
टॅटू फॅशनने मेंदी काढणे पडले महागात :
चिमुकलीची आई किर्स्टी न्यूटनने या घटनेची माहिती तिच्या फेसबुक पोस्टवरून दिली आहे. आणि कशा प्रकारे मेंदी टॅटूमुळे मुलीच्या पायाला इजा झाली याचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझी सात वर्षांची मुलगी माटिल्डाने गेल्या महिन्यात तुर्कीमध्ये सुटीवर असताना हॉटेलमध्ये फुलपाखराचा मेंदी टॅटू काढला होता. एका सुंदर अनुभवाऐवजी तो मुलीसाठी खूप भीतीदायक अनुभव ठरला. ‘रासायनिक रिॲक्शन’मुळे तिच्या पायाची आग होऊन आणि ती चिडचिड करू लागली. शेवटी तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तसेच पालकांसाठी खास संदेश लिहिला की, “कृपया तुमच्या मुलांसाठी मेहंदी टॅटू बनवून घेताना काळजी घ्या.”
तसेच मुलीच्या आईने डॉक्टरांनी सांगितलेली प्रतिक्रियादेखील पोस्टमध्ये लिहिली आहे. डॉक्टरांनी आईला सांगितले की, कधी कधी मेंदीमध्ये अतिरिक्त रंगद्रव्यं वापरली जातात; ज्यामुळे सुटीवरून कुटुंब पुन्हा घरी आले तेव्हा रिॲक्शन दिसण्यास सुरुवात झाली. मुलीनं काढलेला मेंदी टॅटू लाल झाला आणि खाज येऊ लागली आणि नंतर तिची त्वचा जळू लागली. तसेच आईला डॉक्टरांनी सांगितले की, मुलीला काळ्या मेंदीची अॅलर्जी झाली आहे, असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट @kristynewton या आईच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे.