सोशल मीडियावर जसं आपले मनोरंजन करणारे डान्स गाण्याचे रील्स व्हायरल होत असतात. जसं आपलं मनोरंजक करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात, तसंच काही व्हिडीओ आपणाला योग्य ती शिकवण देणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला भाजीपाला आणि फळ विक्रेते ग्राहकांची कशी फसवणूक करतात ते समजणार आहे.
अनेकवेळा लोकांसोबत असं घडते की, ते बाजारात जातात आणि स्वतःहून चांगली फळे, भाजीपाला निवडतात, पण घरी आल्यावर त्यांनी आपल्या हाताने निवडलेला भाजीपाला किंवा फळे खराब झाल्याचं किंवा त्याचा ताजेपणा गेल्याचं दिसून येत. जे पाहून त्यांनाही धक्का बसतो. पण अनेकवेळा तुमच्या हाताने निवडलेला भाजीपाला खराब का निघतो ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची कशी फसवणूक केली जाते ते लक्षात येईल.
दुकानदाराने क्षणात ग्राहकाला फसवलं –
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला बाजारात भाजी आणि फळांची विक्रि करताना दिसत आहे. तिच्या समोर उभी असलेली एक महिला तिच्या चांगल्या फळांची निवड करून ती विक्रेत्या महिलेकडे देत आहे. यावेळी फळे विकणारी महिलादेखील काही चांगली फळे गोळा करुन ग्राहक महिलेच्या पिशवीत टाकताना दिसत आहे. याचवेळी दुकानदार महिला ग्राहक महिलेच्या हातातील पिशवी घेते आणि ती गाड्याच्या खाली टाकते आणि तेथून दुसरी पिशवी बाहेर काढून त्या महिलेला देते.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय हा व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेक ग्राहकांना आपली फसवणूक कशी होऊ शकते आणि होते याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तुमच्यासोबतही असा प्रकार घडू नये, म्हणून जेव्हाही तुम्ही बाजारात खरेदी करण्यासाठी जाल त्यावेळी सतर्क राहा.