देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात आहे. २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्सप्रेसला उदयपूर येथून हिरवा झेंडा दाखवला होता. याच ट्रेनशी संबंधित सध्या एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस ज्या मार्गाने जाणार होती त्या त्या रुळावर अज्ञातांनी मोठमोठे दगड आणि लोखंडाचे तुकडे ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. तर व्हिडिओत रेल्वे कर्मचारी खाली उतरुन, रुळावरील दगड बाजूला काढताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, वंदे भारत एक्सप्रेस उभी असून रेल्वेतील कर्मचारी खाली उतरून रुळावर ठेवलेले दगड उचलून बाजूला टाकताना दिसत आहेत. तर एका ठिकाणी रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याचंही दिसत आहे. त्यामुळे या रुळावरून ही ट्रेन गेली असती तर मोठा अपघात होऊ शकला असता. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे रुळावरुन जाण्यापूर्वीच ती थांबवल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
षडयंत्र की खोडसाळपणा?
रुळावर दगड ठेवणं हे कोणाचं तरी षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर काहीजण हा खोडसाळपणा असू शकतो असं म्हणत आहेत. कारण अनेकजण रेल्वे रुळावर जाऊन रील बनवतात यावेळी ते तिथे पडलेले दगड उचलून रुळावर ठेवतात. शिवाय जेव्हा ट्रेन त्या दगडावरून जाते तेव्हा त्याचे व्हिडिओ शूट करत असतात. परंतु, या व्हिडीओमध्ये लोखंडी रॉडचाही वापर करण्यात आल्यामुळे हे षडयंत्र असल्याचा संशयही अनेकजण व्यक्त करत आहेत. दरम्यान, या घटनेची तक्रार सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यानंतर रेल्वे पोलिसांनीही या बाबत कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. तर भिलवाडा आरपीएफ निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी हे एक मोठं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी हा कोणाचा तरी खोडसाळपणा असल्याचं म्हटलं आहे. एका ट्विटर यूजरने लिहिलं, “देशाचे शत्रू कोण हे शोधून काढले पाहिजे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, ज्याने केले तो देशाचा शत्रूच आहे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.”