अंतराळातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अंतराळ प्रवासापूर्वी तेथील प्रत्येक कार्यासाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येतं. अंतराळवीरांचं राहणीमान आपल्यापेक्षा खूप वेगळं असतं. अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे त्यांना खाण्या-पिण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. याधी सुद्धा अंतराळात मध आणि ब्रेडचा नाश्ता कसा करण्यात येतो हे एका अंतराळवीरानं दाखवलं होत. तर आज अंतराळात कॉफी कशी पिण्यात येते हे दाखवण्यात आलं आहे. महिला अंतराळवीराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात कॉफी पिण्यासाठी अंतराळात कोणता खास कप तयार केला आहे याची खास झलक आणि माहिती सांगितली आहे.
अंतराळातील हा व्हिडीओ युरोपियन स्पेस एजन्सीचा (European Space Agency) आहे. युरोपियन अंतराळवीर महिलेनं अंतराळात कॉफी कशा प्रकारे आणि कोणत्या कपमधून पिण्यात येते याची माहिती सांगितली आहे. एका सिल्व्हर पाकिटात कॉफी भरून ठेवलेली असते. महिला अंतराळवीर सिल्व्हर पाकीट हातात घेते आणि त्याला लहान मुलांच्या बाटलीप्रमाणे एक स्ट्रॉ लावलेला असतो. त्यानंतर एक काचेची छोटी बरणी घेऊन अंतराळवीर ती हवेत सोडते आणि या बरणीमध्ये स्ट्रॉद्वारे कॉफी ओतली जाते आहे. अंतराळवीर बरणीमध्ये ओतलेली कॉफी पिताना दिसते. अंतराळात कॉफी पिण्याची अनोखी पद्धत एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच.
हेही वाचा… याला म्हणतात नशीब! मालकीणबाई करतेय कुत्र्याची मालिश, व्हायरल VIDEO एकदा पाहाच
व्हिडीओ नक्की बघा :
कॉफी पिण्यासाठी स्पेशल कप :
व्हिडीओत पुढे महिला अंतराळवीर कॉफी पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेस कपची (Space Cup) एक झलक दाखवते. अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे हा खास कप बनवण्यात आला आहे. हा कप प्लास्टिकचा आहे. तसेच कपचा आकारसुद्धा खूपच अनोखा आहे. स्पेस कप आकारानं अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखा; पण अगदीच लहान आहे. त्यामधून कॉफी खाली पडणार नाही; तसेच अंतराळवीर त्यातून व्यवस्थित कॉफी पिऊ शकतील या दृष्टिकोनातून तो तयार करण्यात आला आहे. तसेच महिला अंतराळवीर व्हिडीओमध्ये या खास कपमधून कॉफीसुद्धा पिऊन दाखवते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @esa या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. @AstroSamantha समंथा असं या युरोपियन अंतराळवीर महिलेचं नाव आहे आणि अंतराळात अंतराळवीर सकाळी कशा प्रकारे कॉफी घेतात हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. महिला अंतराळवीर कॉफी पिण्याची अंतराळवीरांची पद्धत प्रत्यक्ष करून दाखवते आणि व्हिडीओमध्ये इंग्रजी अक्षरात याची माहिती लिहिलेली असते.