Viral Video : मंगळसूत्र हा स्त्रियांच्या सौभाग्याचा एक अलंकार आहे. मंगळसूत्राचे विविध प्रकार सध्या बाजारात उपलब्ध असतात. रोजच्या वापरण्यासाठी वाटी किंवा चेन मंगळसूत्र; तर सणांदरम्यान पेशवाई, सहा पदरी, डायमंड, तसेच खोटं मंगळसूत्र अशा विविध स्टाईलची मंगळसूत्रे बाजारात उपलब्ध असतात. तर आज या यादीत एक ‘नथ मंगळसूत्र’सुद्धा जोडलं जाणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत घरच्या घरी एक नथीच्या आकाराचं खास मंगळसूत्र बनवण्यात आलं आहे.
पांढऱ्या मोत्यांचे मणी, काळे मणी व सोनेरी रंगाची तार यांच्या मदतीनं हे नथीचं सुंदर मंगळसूत्र बनवण्यात आलं आहे. सगळ्यात आधी एक लाल रंगाचा ब्रॉच घेऊन, त्याच्याभोवती पांढऱ्या मोत्यांचे मणी, काळे मणी सोनेरी तारेच्या मदतीने वर्तुळाकार ओवून घेतले आहेत. त्यानंतर लाल रंगाच्या ब्रॉचखाली एक छोटा हिरव्या रंगाचा ब्रॉच घेऊन, त्याभोवतीसुद्धा पांढरे मोत्याचे मणी आणि काळे मणी तारेच्या मदतीने वर्तुळाकार ओवून घेतले आहेत. अशा प्रकारे नथीचा आकार तयार करून घेतला आहे. त्यानंतर नथीच्या दोन्ही बाजूंना काळ्या मण्यांचे दोन पदर तयार करून घेतले आहेत. अशा रीतीनं असं नथीचं खास मंगळसूत्र बनवण्यात आलं आहे. घरच्या घरी तयार केलेलं नथीचं मंगळसूत्र एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
महाराष्ट्रीयन लूकची शोभा वाढवणाऱ्या नथीपासून तयार केले मंगळसूत्र…
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि अशा सणांदरम्यान महाराष्ट्रीयन लूक नेहमीच ट्रेंड होताना दिसतो. या महाराष्ट्रीयन लूकमध्ये स्त्रिया तयार होताना नऊवारी साडी, चंद्रकोर, ठुशी, नथ, बुगडी, बांगड्या आदी अनेक गोष्टींचा उपयोग करतात. अनेक कलाकार, इन्फ्लुएन्सर व्हिडीओतून नवनवीन कल्पना अनेकांपर्यंत पोहोचवत असतात; तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं दाखवण्यात आलं आहे. महाराष्टीयन लूकसाठी खास नथीचं मंगळसूत्र तयार करण्याची कल्पना व्हिडीओद्वारे युजरनं दाखवली आहे.
स्त्रिया नेहमीच त्यांच्या पोशाखाशी जुळणारी नथ शोधण्याच्या प्रयत्नात असतात. तर तसंच काहीसं लक्षात ठेवून या युजरनं पोशाखाला शोभेल असं खास नथीचं मंगळसूत्र घरच्या घरी बनवून दाखवलं आहे आणि स्त्रियांपर्यंत ही कल्पना पोहोचवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @swetamahadik युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘श्वेता महाडिक’ असं या युजरचं नाव असून, ती सोशल मीडियाची कन्टेस्ट क्रिएटर आहे. तसेच व्हिडीओ बघणाऱ्या अनेकांना मंगळसूत्राची ही अनोखी डिझाईन आवडली असून, अनेक जण युजरच्या कल्पकतेसह रचनेचं विविध शब्दांत कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.