सध्या सोशल मीडियावर पैशांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी गुजरात येथील एका भजनाच्या कार्यक्रमादरम्यान, काही लोकांनी अक्षरश: नोटांचा पाऊस पाडला होता, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता एका तरुणाने धावत्या कारमधून पैसे फेकल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुग्राम येथील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या कारमधून पैसे फेकताना दिसत आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओला दुजोरा दिला असून या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये, एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगात जाताना दिसत आहे. यावेळी कारच्या मागे बसलेला तरुण डिक्कीमधून रस्त्यावर नोटा फेकताना दिसत आहे. शिवाय नोटा फेकणाऱ्या तरुणाने तोंडाला रुमाल बांधल्याचंही दिसत आहे. पैसे रस्त्यावर फेकतानाचा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. शिवाय पैसे एवढे जास्त झाले असतील तर गरीबांना वाटा अशा कमेंट नेटकरी करत आहेत.
हेही पाहा- ८५ फुट लांबून बास्केटबॉलचा बॅक शॉट मारला; Video पाहून म्हणाल, “याच्या पाठीला डोळे…”
ही संपूर्ण घटना रात्रीच्या वेळी घडल्याचं व्हिडिओ पाहून समजतं आहे. शिवाय हे तरुण पैसे फेकताना रस्त्यावर जास्त गर्दी नसल्याचंही दिसत आहे. या नोटा फेकतानाची घटना कोणीतरी कॅमेऱ्यात शूट केली होती, तो व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली असून ते याबाबतचा तपास करत आहेत. त्यामुळे कारमधून पैसे फेकणाऱ्या तरुणांच्या अडचणी वाढणार यात शंका नाही.
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अनेकजण असे विचित्र स्टंट करत असतात. शिवाय अनेकदा असे स्टंट करणं त्यांना महागातही पडतं. कारण, असे व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं, त्यामुळे असे विचित्र स्टंट करणं तरुणाईने टाळावं, असं आवाहन पोलीस सतत करत असतात.