Viral Video: ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट किंवा ट्रेनचालक, असे म्हणतात. ट्रेनमधील बहुतेक कामं तंत्रज्ञानाच्या मदतीनं होत असतात. पण, ड्युटी सुरू झाल्यापासून ते ड्युटी पूर्ण होईपर्यंत लोको पायलट काय करीत असतील, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर, लोको पायलट इंजिन आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करतो. ट्रेनच्या इंजिनामध्ये कोणतीही अडचण तर नाही ना? डिझेल किंवा जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरेशा प्रमाणात आहे ना ? याची तो खात्री करतो. तसेच रेल्वे स्टेशन मास्तरची परवानगी घेतल्यानंतर तो ट्रेन पुढे रवाना करतो. आज सोशल लोको पायलटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत लोको पायलटची ड्युटीदरम्यानची परिस्थिती दाखविण्यात आली आहे.
या व्हिडीओत केबिनची परिस्थिती दाखवीत एका लोको पायलटनं सकाळी १० वाजल्यादरम्यानचा सेल्फी व्हिडीओ शूट केला आहे. त्यामध्ये सुरुवातीला तो, लोको पायलट नितीश कुमार, अशी स्वतःची ओळख करून देतो. नंतर कामाचं स्वरूप सांगत १२ ते १४ तास ड्युटी करावी लागते, असे तो सांगतो. तसेच एकेक करून स्वतःच्या समस्या सांगत तेथे लावलेला पंखादेखील काम करीत नाही, थंडीत लावलेलं हिटरसुद्धा अनेकदा काम करीत नाही, असे म्हणतो. तसेच पायलटची बसण्याची सीटसुद्धा तुटलेली दिसते आहे. एकदा पाहाच केबिनची परिस्थिती सांगणाऱ्या लोको पायलटचा हा व्हिडीओ.
हेही वाचा…घृणास्पद! दोन श्वानाच्या गोंडस पिल्लांना महिलेनं फेकलं कचराकुंडीत…; CCTV व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ नक्की बघा….
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, लोको पायलट सांगत आहे की, १२ ते १४ तास ड्युटी करताना, या उकाड्यात प्रवाशांना सुरक्षित नेण्याची जबाबदारी लोको पायलटची असते. पण, ही जबाबदारी पार पडताना त्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे खुद्द लोको पायलटने व्हिडीओत सांगितलं आहे. तसेच तो पुढे सांगतो की, जर तुम्हाला लोको पायलट व्हायचं असेल, तर आधी ही परिस्थिती पाहून घ्या. “मीसुद्धा एक माणूसच आहे. मी अजून थोडा अभ्यास केला असता, तर खूप बरं झालं असते”, असे तो व्हिडीओद्वारे सांगतो आहे; जे ऐकून कोणीही थक्क होईल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mshahi0024 या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नमस्कार @अश्विनी वैष्णव जी… भाजपचा कोणताही नेता भारतीय रेल्वे लोको पायलटच्या केबिनमध्ये अशा वाईट परिस्थितीत प्रवास करू शकतो का? आणि तेही ४५ सेल्सिअसमध्ये’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच गाडीचा नंबर 24644 LKU आणि 27601 TATA वरून धावणाऱ्या ट्रेनचा कर्मचारी त्याचा भयानक अनुभव शेअर करीत आहे, असेदेखील नमूद केले आहे.