सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये अनेक व्हिडीओ पोलिसांशी संबंधित असतात. अनेकवेळा पोलिसांनी गुन्हेगारांवर केलेली कारवाई किंवा लाठीमार केल्याचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. तर काही वाहतूक पोलिस आपल्या वर्दीचा गैरवापर करत अनेकांकडून पैसे वसूल करतानाही आपण पाहिलं आहे. पण सध्या पोलिसांचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रस्त्यावर काहीतरी गोळा करताना दिसत आहे. नीट पाहिल्यावर समजतं की तो व्यक्ती रस्त्यावरून डाळीचं पोतं घेऊन जात असताना ते अचानक फुटल्याने डाळ रस्त्यावर सांडली होती. त्यानंतर तो व्यक्ती ऐन रहदारीच्या रस्त्यावर पडलेली डाळ गोळा करायला सुरुवात करतो. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी जे कृत्य केलं ते पाहून नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांच्या कामाला सलाम केला आहे.
पोलिसांनी केली वृद्ध व्यक्तीची मदत-
मुकेश त्यागी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका वृद्ध व्यक्तीची डाळ रस्त्यावर सांडली होती. परतापूर पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक थांबवून त्याला डाळ गोळा करण्यात मदत केली. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कौतुकास्पद कामाची चर्चा सर्वत्र होत आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मेरठ पोलिसांचे सुंदर आणि प्रशंसनीय काम, पोलिसांचे मनःपूर्वक आभार.’ आणखी एकाने लिहिलं आहे की, आता मदत करणारे पोलीस फार कमी उरले आहेत ज्यांच्यामध्ये माणुसकी आणि बंधुभाव आहे.