Pune Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय असे शहर आह. या शहराचा इतिहास, येथील संस्कृती या शहराची ओळख आहे. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, खाद्यसंस्कृती नेहमी चर्चत असतात.पुणेरी भाषा ते पुणेरी लोक सुद्धा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात.

सध्या असाच एक पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एफसी रोडवर एक तरुण नवरदेवाची वेशभूषा परिधान करून हातात ड्रम घेऊन उभा आहे आणि त्या ड्रमवर त्याने एक संदेश लिहिला आहे. ड्रमवरील हा संदेश वाचून कोणीही अवाक् होईल. या तरुणाने नेमके काय लिहिलेय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

सध्या एक नवीन ट्रेंड आला आहे. अनेक इन्फ्लुअन्सर पाटीवर संदेश लिहून आणि ती पाटी हातात धरून रस्त्यावर उभे राहतात पण पुण्यातील या तरुणाने चक्क ड्रम हातात घेऊन त्यावर संदेश लिहिला आहे. त्याने नवरदेवाचा वेश परिधान केला आहे आणि ड्रमवर लिहिलेय, “ड्रममध्ये पाणी भरणारी हवी, मला भरणारी नको” त्याचा हा संदेश ऐकून काही तरुण मंडळी सहमती दर्शवत आहे तर काही मंडळी त्याचा फोटो किंवा व्हिडीओ काढताना दिसत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय प्रकरण आहे?

काही दिवसांपूर्वी एक हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केली होती. तिने हत्या केल्यानंतर पतीचा मृतदेह एका ड्रममध्ये ठेवला होता. या घटनेने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. म्हणून या पुणेकर तरुणाने लग्नासाठी वधू हवी आहे, या आशयाचा व्हिडीओ बनवला आणि पाटीऐवजी ड्रमवर लिहिलेय की त्याला ड्रममध्ये पाणी भरणारी हवी आहे पण त्याला भरणारी नको.

व्हिडीओ व्हायरल

pavanwaghulkar या तरुणाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ड्रम ची दहशत झालीय” तर एका युजरने लिहिलेय, “भाऊ चेष्टेचा विषय नाही तो, जीव गेलाय माणसाचा …” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा ज्योकचा विषय नाही भावा” काही युजर्सनी हा मस्करीचा विषय नसल्याचे म्हणत या तरुणाला फटकारले आहे.