सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर महाराजांचे तसेच गडकिल्ल्यांचे अनेक नवे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण गडकिल्ल्यावर सिगारेट ओढताना काही तरुणांना दिसतो. त्यानंतर हे तरुण मंडळी त्याला चांगलेच खडे बोल सुनावतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका गडकिल्ल्यावरील आहे. काही तरुण मंडळी गडाच्या पायथ्याशी बसलेले दिसत आहे. अचानक तेथून दोन तरुण गडावर जाताना दिसतात. त्यातल्या एका तरुणाच्या हातात पेटती सिगारेट असते. त्यावर ही तरुण मंडळी त्याला जाब विचारतात? एक म्हणतो, “गडावर सिगारेट प्यायला येतो?” तर दुसरा विचारतो, “तु कुठून आलाय?” त्यानंतर तो सिगारेट लपवताना दिसतो. तेव्हा पुन्हा पहिला तरुण विचारतो, “तुझ्या हातामध्ये काय आहे दाखव आणि तु कोणत्या शहरातून आलाय” त्यावर तरुण म्हणतो, “मी कर्नाटकातून आलोय मला माहिती नाही, बोर्ड पण नाही. ” त्यावर दुसरा तरुण संतापतो आणि म्हणतो, “बोर्ड नाही पण तुला कळत नाही? तुला अक्कल नाही का” त्यानंतर तो तरुण सॉरी म्हणतो आणि निघून जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा एक जण त्याला थांबवतो आणि म्हणतो, “रक्त गाडले येथे लोकांनी” त्यानंतर त्याच्याजवळ असलेले सर्व सिगारेट तरुण मंडळीने काढून घेतले आणि त्यानंतर त्याला पुढे जाण्यास परवानगी दिली.
या व्हिडीओवर लिहिलेय, “अजून कधी पर्यंत हे घडत राहणार आपल्या महाराजांच्या गडावर. परप्रांतीयांनी यावं आणि अशा गोष्टी करायच्या?”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
sahyadri_life या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गडकिल्यांची कधी सुटका होणार अश्या कृत्यापासून?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्या महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यावर प्यायला येतात लाज वाटू द्या जरा” तर एका युजरने लिहिलेय, “यामुळे वणवा पेटतो, वृक्ष व प्राण्यांची हानी होते” आणखी एका युजरने लिहिलेय, “कर्नाटकचा आहे म्हणतो आणि मस्त मराठी बोलतो. असेल इथलाच पण घाबरून कर्नाटक सांगतोय”