Viral Video : देशभरात गेल्या १४ जानेवारीला मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. वर्षाच्या या पहिल्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी एकमेकांना तिळगूळ वाटत शुभेच्छा दिल्या जातात. प्रेमाने तिळदूळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश दिला जातो. सोशल मीडियावर मकरसंक्रांती निमित्त अनेक रील्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशातच एका तरुणाने सोशल मीडियावर मकर संक्रांतीच्या हटके शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणाने नेमके काय केले, हे जाणून घेण्यासाठी तु्म्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
“…महाराष्ट्रात मराठीच बोला” तरुणाने स्पष्टच सांगितले
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण हातात पाटी घेऊन रस्त्याच्या शेजारी उभा आहे. त्याने त्याच्या पाटीवर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत हटके संदेश लिहिला आहे. त्या तरुणाने पाटीवर लिहिलेय, “तिळगूळ घ्या आणि महाराष्ट्रात मराठीच बोला! सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!” येणारे जाणारे तरुणाच्या पाटीवरील संदेश वाचताना दिसत आहे.
अलीकडे हा नवीन ट्रेंड आला आहे. तरुण मंडळी हातात पाटी घेऊन रस्त्यावर, रस्त्याच्या शेजारी किंवा गर्दीच्या ठिकाणी उभे राहतात आणि या पाटीवर कधी मजेशीर तर कधी भन्नाट, कधी भावनिक तर कधी प्रेरणादायी संदेश लिहितात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
rahul_khurpade या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच चालणार” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी बरोबर आहे मी मराठीतच बोलते सर्वांशी. समोरच्या माणसाला मराठी येत नसेल तर आणि तो हिंदी बोलत असेल तर मी मुद्दामच मराठी बोलते त्याला कळव अथवा न कळो.” तर एका युजरने लिहिलेय, “हिम्मत लागते भाऊ आणि तू ते करून दाखवलंस…. सुरवात करणं खूप गरजेचे आहे… जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा एक नंबर” अनेक युजर्सनी या तरुणाच्या संदेशावर सहमती दर्शवली आहे. काही युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd