वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर आपल्याला दंड भरावा लागतो. आपल्यापैकी अनेकांना या गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांत आपण दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतो आणि दंड भरत नाही, पण यामुळे अनेकदा आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं आणि एकदम आपल्या खिशाला कात्री लागू शकते. सध्या असेच एक उदाहरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका तरुणाला ४० चलनाचा दंड एकदम भरावा लागला आहे.
ही घटना बंगळुरूमधील असून येथील पोलिसांनी अशा एका तरुणाला पकडले आहे ज्याच्या बाईकवर एक-दोन नव्हे तर तब्बल ४० चलन प्रलंबित होते. चलनाची एवढी लांबलचक यादी घेऊन जाणाऱ्या या तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा तरुण लांबलचक यादी घेऊन उभा असल्याचे फोटोत दिसत आहे आणि त्याच्या शेजारी बंगळुरूचा एक वाहतूक पोलिसही दिसत आहे.
रिपोर्टनुसार, या तरुणाला ४० चलान एकाच वेळी भरावे लागले आहेत. हा फोटो तलघाटपुरा ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट केला असून एकूण ४० केसेस प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. हा दंड भरण्यासाठी बाईकस्वाराला एकूण १२ हजार रुपये खर्च करावे लागले आहेत. शिवाय तरुणाने हे पैसे भरल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, बाईकस्वाराला कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन पाठवण्यात आले, हे स्पष्ट झालेले नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या प्रकरणावर आता लोक व्यक्त होऊ लागले आहेत. एकाने म्हटलं आहे, “लिस्ट अशी दाखवत आहे जणू काही अभिमानास्पद काम झाले आहे.” तर दुसर्या युजरने, पोलिसांवरच प्रश्न उपस्थित करत “चलनाचे पैसे गोळा करणे तुमचे काम नाही” असे कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर तिसऱ्याने, “एवढ्या दंडाने काहीही होणार नाही, अशा चालकाचे लायसन्स रद्द करा, अशा लोकांना वाहन चालवू देऊ नये.” अशी कमेंट केली आहे. तर अनेक नेटकरी या फोटोवर मजेशीर कमेंटदेखील करत असल्याचं पाहायला मिळत आहे.