सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तरुणाने धक्कादायक आणि विचित्र कृत्य केलं आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओतील माथेफिरु तरुणाने नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवत एका सोसायटीमधील १५ वाहनांवर ॲसिड ओतलं आहे. शिवाय गाड्यांवर ॲसिड ओतल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी त्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
नोकरीवरुन काढल्याचा राग मनात धरुन या तरुणाने गाडीवर ॲसिड फेकल्याची घटना सोसायटीमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नोएडा येथील सेक्टर ७५ येथील मॅक्सवेल स्नो व्हाईट हाऊस सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली आहे. पार्कींगमध्ये लावण्यात आलेल्या जवळपास १५ कारवर या तरुणाने ॲसिड फेकल्यामुळे या वाहनांचे रंग व काचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सोसायटीमधील लोकांनी नोकरीवरून काढून टाकल्यामुळेच त्याने गाड्यांवर ॲसिड फेकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरदोई येथील रहिवासी असून रामराज असं त्याचं नाव आहे.
हेही पाहा- मामा असावा तर असा…! भाचीला लग्नात दिल्या ३ कोटींच्या भेटवस्तू, व्हायरल Video पाहून थक्क व्हाल
पोलिसांनी सांगितले की, रामराज हा सोसायटीत गाड्या साफ करण्याचे काम करायचा. त्याच्या कामावर सोयायटीमधील अनेक लोक नाखूश होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्याला सोसायटीने कामावरून काढून टाकले होते. याचाच राग मनात ठेवून रामराजने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर अॅसिड फेकले. ज्यात सुमारे १५ वाहनांचे नुकसान झाले. सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो तरुण एकामागून एका वाहनांवर ॲसिड फेकताना दिसत आहे.