उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेसवेवर एक युट्यूबरचा भरधाव वेगाने बाईक चालवताना जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला युट्यूबर ताशी ३०० किलोमीटर वेगाने बाइक चालवत असताना त्याची बाईक दुभाजकावर धडकली. या धडकेत युट्यूबरचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत यूट्यूबरचे नाव अगस्त्य चौहान असं आहे. अगस्त्य आपल्या रेसिंग बाइकवरून आग्राहून दिल्लीला जात होता. यावेळी त्याचे बाइकवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळली. युट्युबरने हेल्मेट घातले होते, मात्र त्याच्या बाईकचा वेग इतका होता की, हेल्मेट घातलेलं असूनही त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत युट्यूबरच्या चॅनेलवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत –
अपघातात मृत्यू झालेला अगस्त्य चौहान हा दिल्लीचा रहिवासी होता. अगस्त्य एक यूट्यूब चॅनेल चालवायचा. यासाठी तो सतत नवनवीन व्हिडिओ बनवायचा. महत्वाचे म्हणजे अगस्त्यचे व्हिडीओ कोट्यवधी लोक पाहायचे शिवाय त्याच्या चॅनेलला लाखो लोक सबस्क्राइबर्सही करतात. तो बाईक चालवतानाचे प्रोफेशनल व्हिडिओ बनवत असे. महत्वाचं म्हणजे त्याने आपल्या व्हिडिओमधून फॉलोअर्सना वेगाने गाडी चालवू नका असं आवाहन देखील केलं होतं.
लाँग राईड स्पर्धेत सहभागी घेणार होता-
यूट्यूबर अगस्त्य चौहान दिल्लीत होणाऱ्या लाँग राईड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता. अगस्त्याने त्याची रेसिंग बाइक ताशी ३०० किलोमीटर वेगाने चालवण्याचा प्रयत्न केला. बाईक चालवताना तो व्हिडिओही बनवत होता. यमुना एक्सप्रेसवेवर ताशी ३०० किलोमीटरच्या वेगाने रेसिंग बाइक चालवताना त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, अगस्त्यचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून ते अधिकचा तपास करत आहेत.