सध्या इंटरनेट वापरणाऱ्या नेटकऱ्यांना ‘भाडिपा’ हे नाव ओळखीचे झाले आहे. मराठमोळ्या नेटकऱ्यांसाठी स्टॅण्डअप कॉमेडी, वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ, कास्टींग काऊच यासारखे अनेक प्रयोग आत्तापर्यंत भाडिपा अर्थात भारतीय डिजीटल पार्टीने केले आणि त्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. नुकताच ‘भाडिपा’ने आपल्या लोकप्रिय ‘आई आणि मी’ सिरीजमधील आणखीन एक व्हिडीओ अपलोड केला आहे. तरुणाईचा लाडका मित्र असणाऱ्या आळस या विषयाभोवती फिरणाऱ्या या व्हिडीओचे नाव आहे ‘आई मी आणि आळस.’ व्हिडीओ भाडिपाच्या फेसबुक पेजवर अपलोड केल्यानंतर अगदी काही तासांमध्ये या व्हिडीओला हजारोच्या संख्येने शेअर झाला आहे.
‘आई आणि मी’ सिरीजमधील या नवीन व्हिडीओच्या माध्यमातून आईची भूमीका करणाऱ्या अभिनेत्री रेणूका दफ्तरदार आणि मुलाची भूमिका करणारा आलोक राजवाडे पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या भेटीला आले आहेत. मुलांच्या लाडक्या आळसाबद्दलचा हा व्हिडीओ सध्या फेसबुकवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे आई आणि मुलाची ही जोडी भाव खाऊ गेली आहे. विळीने केस चिरण्याची धमकी, परवापासून घरी असलेला मित्र, रात्री दोन वाजता पाण्याची बॉटल ऑर्डर करणे, डिलिव्ही बॉयला केस कापण्याचा आईने दिलेला सल्ला, पबजीमध्ये दंग झालेली आई असे अनेक धम्माल किस्से या व्हिडीओमध्ये आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये आईचे ट्रेण्डमार्क असलेले ‘शास्त्र असतं ते’ हे वाक्य मिसिंग असल्याने नेटकऱ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं हेही तितकचं खरं. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे या एपिसोडमध्ये पर्ण पेठे बबडुच्या म्हणजेच ‘मी’च्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसली आहे.
तर असा हा झी टॉकीजच्या कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात ‘बेस्ट मराठी वेब सिरीज’चा पुरस्कार पटकावणाऱ्या ‘आई आणि मी’ वेब सिरीजमधील आळसावरील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होता आहे. मुलांबरोबर फेसबुकवर असणाऱ्या स्मार्ट आयांनी तुम्हाला आमच्या मुलांबरोबरच संवाद कसे काय समजले असा प्रश्न ‘भाडिपा’ला विचारला आहे.
एकंदरितच आई आणि मुलामधील ही तू तू मैं मैं ची कहाणी घरोघरी मातीच्या चुलीसारखी सगळीकडेच असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच अनेकजण या व्हिडीओशी रिलेट करताना दिसत आहेत.