कुंभमेळ्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे. राजधानी लखनौ येथे तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कैबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नामांतरणाची घोषणा उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिली होती. मात्र आता या निर्णयावरून योगी अदित्यनाथ यांना सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. #AajSeTumharaNaam हा हॅशटॅग वापरून नेटकरी योगी अदित्यनाथ एखाद्या व्यक्तीचे नाव बदलून काय ठेवतील या संदर्भातील मीम्स शेअर करत आहेत.
योगी अदित्यनाथ यांना जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी निवडणून दिले असताना ते शहरांचे नामकरण करत सुटले असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. दोन ते तीन फोटो असणाऱ्या या मीम्समध्ये योगी अदित्यनाथ फोनवर एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या नावाने बोलताना दाखवण्यात आले आहेत. त्यानंतर पलिकडची व्यक्तीही फोनवर हा बोलतोय अशा स्वरुपाचे शब्द बोलते. त्यानंतर शेवटच्या फोटोत पुन्हा कानाला फोन लावलेले योगी अदित्यनाथ त्या व्यक्तीचे नाव बदलून त्याला भारतीय टच देऊन त्याचे नावच बदलून टाकतात. अशाप्रकारचे शेकडो मीम्स सध्या फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅप स्टेटसमध्ये दिसून येत आहेत. यामध्ये अगदी रजनीकांतपासून मायकल जॅक्सनपर्यंत आणि टॉम अॅण्ड जेरीपासून खेळाडूंपर्यंत सर्वांच्याच नावाला नेटकऱ्यांनी योगी टच दिल्याचे दिसत आहे. या ट्रेण्डमधून मालिका आणि सिनेमाही सुटले नाहीत. अदित्यनाथ यांनी मालिका आणि सिनेमांची नावे ठेवली असती तर ती कशी यासंदर्भातील मीम्सही चांगलेच व्हायरल झालेत. पाहूयात असेच काही व्हायरल झालेले मीम्स…