दररोज नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिस दलातील अधिकारी ठिकठिकाणी पहारा देतात. प्रत्येक सणांदरम्यान खाकी वर्दी घालून स्वतःची सुख-दुःख बाजूला ठेवून आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक आनंदात सहभागी होतात आणि चोवीस तास नागरिकांची सेवा करण्यासाठी तयार असतात. तर आज सोशल मीडियावर मुंबई पोलिसांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या उत्तम कामगिरीची एका गाण्याद्वारे झलक दाखवण्यात आली आहे.
‘आले रे आले मुंबई पोलिस’ असे या गाण्याचे नाव आहे. व्हिडीओत खाकी वर्दीत विविध श्रेणीतील पोलिस कर्मचाऱ्यांना दाखवलं आहे. यामध्ये महिला पोलिस अधिकारी यांचासुद्धा समावेश आहे. व्हिडीओत मुंबई पोलिस नागरिकांना कशाप्रकारे मदत करतात याची सर्व दृश्य पाहून तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आणि अंगावर काटा येईल एवढं नक्कीच. एकदा पाहाच हा व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विनाहेल्मेट प्रवास करणारा तरुण ट्रॅफिक पोलिसांना फसवून पुढे जातो आणि त्याचा नंतर अपघात होतो. पण, नंतर हेच ट्रॅफिक पोलिस त्या तरुणाच्या मदतीला जातात. नंतर रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीची छेड काढणाऱ्या तरुणींना निर्भया पथक वेळेत येऊन मदत करताना दाखवलं आहे. हरवलेल्या लहान मुलांना, तर सोन्याची वस्तू चोरून नेणाऱ्या चोरट्यांकडून नागरिकांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्यापर्यंत सुखरूप पोहचवण्यात मुंबई पोलिस कसे यशस्वी होतात हेसुद्धा व्हिडीओच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.
आले रे आले मुंबई पोलिस! हे गाणं मयूर राणे यांनी तयार केलं आहे. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ मुंबई पोलिस यांच्या @mumbaipolice या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी पोलिसांच्या कामगिरीचे विविध शब्दांत कौतुक, तर अनेक जण भावुक होताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच आशा आहे की, हे खास गाणं ऐकल्यानंतर तुमच्याही मनात अभिमानाची भावना निर्माण होईल, जशी आमच्यामध्ये निर्माण झाली आहे; असे कॅप्शन या गाण्याला मुंबई पोलिसांनी दिले आहे.