Arvind Kejriwal Viral Video: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला. केजरीवाल यांना रिक्षाचालकाच्या घरी जात असताना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव थांबवल्याने भर रस्त्यात तुफान ड्रामा पाहायला मिळाला. अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांना ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’ अशा शब्दात सुनावताच सोशल मीडियावर मात्र अन्य पक्षांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. काही क्षणातच हा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला असून आता यावरून केजरीवाल कसे आपलंच बोलणं विसरतात अशी टीका सुद्धा होत आहे.
परवेश सिंह राणा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यात केजरीवाल यांच्या बोलण्यातील विरोधाभास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी लोकसभेच्या दालनात केजरीवाल यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून तुफान फटकेबाजी केली होती. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मला, दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला सुरक्षा देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा असंही केजरीवाल म्हणताना दिसत आहेत. मात्र आता सुरक्षा मिळत असताना मला तुमची सुरक्षा नको असा पवित्रा केजरीवालांनी घेतल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय.
या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये परवेश सिंह राणा यांनी केजरीवाल यांना कलाकार म्हणून टोमणाही मारला आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
काय म्हणाले होते केजरीवाल?
केजरीवाल यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावताना म्हंटले की, जनतेमध्ये जाताना प्रोटोकॉल कशासाठी हवा? तुमचे नेते जनतेमध्ये जात नाहीत, म्हणून ते दुखी आहेत असं सांगत संताप व्यक्त केला. नेत्यांना सांगा थोडे प्रोटोकॉल तोडा आणि जतेनमध्ये जा असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. आम्हाला तुमची सुरक्षा नको, तुमची सुरक्षा मंत्र्यांना द्या.