Ambulance Accident Video: ‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.

सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.

रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भरधाव वेगात येणाऱ्या अँब्युलन्सने दोन निष्पाप लोकांचा जीव धोक्यात टाकला. नेमकं काय घडलं, जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका रस्त्याच्या कडेला एक माणूस स्कूटरवर बसलेला असतो. त्याच्या बाजूला लहान मुलगादेखील उभा असतो. तितक्यात अचानक भरधाववेगात एक अँब्युलन्स येते आणि त्याच वेगात तिथे असलेल्या माणसाला आणि लहान मुलाला धडक देते. धडक देताच त्या माणसासह लहान मुलगा जोरात आदळून खाली कोसळतो. अपघात होताच आजूबाजूला लगेच माणसं गोळा होतात.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @fatal_clipss या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ३.२ मिलियन व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली, हे अद्याप कळू शकलं नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्या लहान मुलाची काय चूक होती” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “एका रुग्णाला घेऊन जात असताना तुम्ही दोघांचे जीव घेतले” तर एकजण कमेंट करत म्हणाला, “एवढी कसली घाई की समोर दोन माणसं दिसत नाहीत तुम्हाला” तर एकाने “काय अवस्था झाली असेल त्यांची?” अशी कमेंट केली.