Viral News Today: काय भुललासी वरलिया रंगा..पुस्तकाच्या आवरणावरून पुस्तकाची परीक्षा करू नये अशी एक म्हण फार पूर्वीपासून प्रख्यात आहे. अनेकदा नकळतच आपण कपड्यांवरून इतरांची पात्रता ठरवतो. सगळं काही टिप टॉप लागणाऱ्या या मंडळींना अनेकदा साध्या कपड्यातील पण कमाल हुशार व्यक्ती अनपेक्षित धक्का देऊन जातात. असाच काहीसा प्रकार गुरुग्राममधील एका व्यक्तीबाबत अलीकडे घडला. यावरून त्यांनी थेट लिंकडीन गाठून एका खास पोस्टमधून झाल्या प्रकाराची माहिती दिली आहे.
तर झालं असं की, गुरुग्राम येथे राहणाऱ्या राजेश सिंह यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एक गॅस सिलेंडर पोहोचवणारा कर्मचारी आला होता. इंडेन गॅस कंपनीच्या या कर्मचाऱ्याचा फोटो पोस्ट करून राजेश यांनी लिंकडीनवर त्याबद्दल माहिती दिली आहे. या ओळी वाचून नेटकरीही या कर्मचाऱ्याच्या जिद्दीला सलाम करत आहेत.
राजेश यांनी पोस्ट मध्ये लिहिले की, गुरुग्रामच्या सेक्टर ६७ मध्ये त्यांच्या घरी गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी संदीप यादव नामक एक २४ वर्षीय तरुण आला होता. संदीप हा विज्ञान शाखेतील इंग्रजी भाषेचा पदवीधर आहे. संदीपचे आईवडील वयस्कर असल्याने नोकरी मिळेपर्यंत तो हे सिलेंडर पोहोचवण्याचे काम करत आहे. दिवसाला २५-३० सिलेंडर डिलिव्हरी करून त्याला महिन्याला १२ हजार रुपये मिळतात यातही ८ हजार तो आई वडिलांसाठी गावी पाठवतो व अवघ्या 4 हजारात आपला महिना काढतो. संदीपने सांगितले की तो २० लोकांसोबत राहतो, ज्यामुळे त्याचा खर्च बराच कमी होतो. इतक्या समस्या असतानाही शेवटी जाताना संदीप ‘अच्छे दिन आऐंगे’ असं म्हणून गेल्याचेही राजेश यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
पहा पोस्ट
दरम्यान, राजेश यांची पोस्ट पाहून अनेकजण भावुक झाले आहेत. आतापर्यंत 17 हजार युजर्सनी ही पोस्ट लाईक केली आहे तर काहींनी त्याचा नंबर मागितला आहे जेणेकरून त्याला चांगल्या पगाराची नोकरी देता येईल. परिस्थितीने हार न मानणाऱ्या संदीपच्या जिद्दीला खरोखरच सलाम!