रॅम्पवर फक्त सुंदर दिसणा-या, गो-या वर्णाच्या आणि उंचच मुलींना स्थान मिळते हे कोणी सांगितले, सौंदर्याच्या या भ्रामक समजूती खोडून अॅसिड हल्ल्यात चेहरा आणि संपूर्ण शरीर विद्रुप झालेली लक्ष्मी आता लंडन फॅशनवीकमध्ये रॅम्पवर चालणार आहे. लंडन फॅशन वीक हा देखील आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वातला महत्त्वाचा इव्हेंट मानला जातो. या फॅशन विकमध्ये युरोप फॅशन विश्वातले अनेक महत्त्वाचे ट्रेंड पडतात. याच फॅशन वीकमध्ये अॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवाल रॅम्पवॉक करणार आहे.
लंडन फॅशन वीक सुरू झाला आहे. २० सप्टेंबरपर्यंत तो चालणार आहे. यात मेघालयचे डिझायनर रुपर्ट लिन्राह हे आपले कलेक्शन रॅम्पवर उतरवणार आहे . त्यांचे हे कलेक्शन लक्ष्मी रॅम्पवर सादर करणार आहे. लक्ष्मी सोबत तिचे पती आणि छोटी मुलगी देखील असणार आहे. दोन दिवसांपूर्वी एका चॅरिटेबल कार्यक्रमात लक्ष्मीने इतर अॅसिड हल्ल्यातील तरूणींसोबत रॅम्पवॉक देखील केला. आंतराराष्ट्रीय रॅम्पवर आपल्याला चालण्याची संधी दिल्याबद्दल तिने सगळ्यांचे आभार मानेल. सध्या लक्ष्मी अनेक सामाजिक कार्यात गुंतली आहे. अॅसिड हल्ल्याच्या विरोधात तिने मोहिम सुरु केली आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या महिलांचे सबलिकरण करण्याचे काम लक्ष्मी करते. कोणाच्या दिसण्यावरून त्याची ओळख न बनता त्याच्या कामावरून समाजात त्याचे नाव व्हायला हवे असेही लक्ष्मी अभिमानाने सांगते.
लक्ष्मीच्या या प्रयत्नाची दखल अमेरिकेच्या फर्स्ट लेडी आणि ओबामाच्या पत्नी मिशेल ओबामांनी देखील घेतली. भारतातल्या अॅसिड हल्ल्याविरोधात धाडसाने मोहिम सुरु केल्याबद्दल तिला आंतराष्ट्रीय पातळीवर साहसी पुरस्कार देखील देण्यात आला होता. गेल्याच आठवड्यात रेश्मा कुरेशी हिने देखील न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करून संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. रेश्मावर देखील अॅसिड हल्ला झाला होता यात तिने आपला एक डोळा गमावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा