करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरातल्या प्रशासकीय यंत्रणांनी धास्ती घेतली आहे. या व्हेरिएंटवर सध्या अस्तित्वात असलेल्या लसी प्रभावी ठरतील की नाही? हा व्हेरिएंट नेमका किती घातक आहे? याविषयी अजूनही जगभरातले संशोधक अभ्यास करत आहेत. अशातच कोविशिल्ड लसीचं उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे डेल्टा, ओमायक्रॉनवर व्हायरल होत असलेलं एक मीम असून ती होम अलोन या टीव्ही शोमधल्या एका सीनची व्हिडीओ क्लिप आहे. मात्र, त्यात डेल्टा, ओमायक्रॉन आणि व्हॅक्सिनचा समावेश करून त्यातून मीम तयार करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

अदर पूनावाला यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये होम अलोन या टीव्ही शो सीरीजमधला एक सीन आहे. हे मीम मूळत: जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं करोना आणि लसीकरण याविषयी जनजागृती करण्यासाठी शेअर केलं होतं. तीच क्लिप अदर पूनावाला यांनी पुन्हा एकदा शेअर केली आहे.

या क्लिपमध्ये होम अलोन सीरीजमधील हॅरी आणि मार्व हे दोन चोर दिसत आहेत. चोरीच्या उद्देशाने ते एका घरात शिरतात. पण तिथल्या एका मुलाच्या हुशारीमुळे त्यांचा प्लॅन फसतो, असं या व्हिडीओमध्ये आहे. पण मीम बनवताना या पात्रांना करोनाशी संबंधित गोष्टींची नावं देण्यात आली आहेत.

डेल्टा आणि ओमायक्रॉनचा कपाळमोक्ष!

व्हिडीओमध्ये आधी ओमायक्रॉन नाव दिलेला हॅरी घरात शिरण्याचा प्रयत्न करत असताना वरच्या मजल्यावरून होम अलोनमधील लहान मुलाचं पात्र असलेला केविन मॅककॅलिस्टर वरून एक दोरीला बांधलेली कुंडी खाली सोडतो. त्यावर व्हॅक्सिन असं लिहिलेलं आहे. ओमायक्रॉन खाली वाकतो आणि व्हॅक्सिनमुळे डेल्टाचा कपाळमोक्ष होतो. ओमायक्रॉन खूश होत असतानाच मॅककॅलिस्टर पुढची कुंडी सोडतो ज्यावर बूस्टर डोस असं लिहिलेलं आहे. ती कुंडी ओमायक्रॉनवर आदळते आणि तोही खाली पडतो.

जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यामध्ये “लस घेतल्यानंतर आणि त्यावर बूस्टर डोस घेतल्यानंतरच कोविड-१९मधून येणाऱ्या आजारांचा तुम्ही सामना करू शकता”, असा संदेश देखील लिहिला आहे.

हा व्हिडीओ अदर पूनावाला यांनी शेअर केला आहे. यासोबत “इथे नेमकं घडतंय काय?” असा एक उपहासात्मक संदेश देखील अदर पूनावाला यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओ मीमवर नेटिझन्सकडून तुफान प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adar poonawalla shares meme video of home alone series delta omicron booster dose pmw
Show comments