Aditya-L1 Latest Update : इस्रोने चांद्रयानानंतर आपली पहिली सौरमोहीम यशस्वीरीत्या सुरू केली आहे. मोहिमेतील ‘आदित्य एल१’ यानाने पृथ्वीभोवतीचा पहिचा कक्षा विस्तार यशस्वीपणे पार केला आहे. या यानाच्या सर्व यंत्रणा व्यवस्थितरीत्या काम करीत असून, त्याची कार्यप्रणाली उत्तम आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या सौरमोहिमेचे आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक होत आहे. या मोहिमेसाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी कित्येक वर्षे मेहनत घेतली. यादरम्यान ‘आदित्य एल-१’ मिशनसाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आणि परफ्युमचे एक मनोरंजक कनेक्शन समोर आले आहे. ‘आदित्य एल-१’ यानातील सात पेलोड आणि परफ्युमचा ३६ चा आकडा होता. त्यामुळे यानाच्या मुख्य पेलोडवर काम करताना वैज्ञानिक व इंजिनीयरना परफ्युम किंवा स्प्रे लावून येण्यास सक्त मनाई होती. पण, त्यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊ …
आदित्य एल-१ उपग्रहामध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड आहेत. त्यात व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ (VELC) हे मुख्य उपकरण आहे; ज्यामार्फत सूर्याची अनेक रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न केले जातील. या उपकरणाची निर्मिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (IIA)मधील टीमने केली आहे. पण हे उपकरण बनवताना सर्व वैज्ञानिकांना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, स्प्रे किंवा डिओ वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. याबाबत टीमचे प्रमुख नागभूषण एस. यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सविस्तर माहिती दिली आहे.
‘आदित्य एल१’च्या निर्मितीवेळी परफ्युम, डिओ स्प्रे वापरणाऱ्यांना ‘नो एन्ट्री’
माहितीनुसार, व्हिजिबल एमिशन लाईन कोरोनाग्राफ (VELC) उपकरण तयार करताना त्यात कम्पोनन्ट लेव्हल व्हायब्रेशन हा एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. त्यामध्ये डिटेक्टर आणि ऑप्टिकल घटकांना एकत्रित करण्याची प्रोसेस पार पाडण्यात आली. हे इंटिग्रेशन पार पडल्यानंतर अगदी सहजपणे त्याचे कॅलिब्रेशन करण्यात आले. या सर्व प्रक्रियेदरम्यान एखादा जरी सूक्ष्म कण मशीनमध्ये गेला असता, तर वैज्ञानिकांची कित्येक महिन्यांची मेहनत पाण्यात गेली असती.
त्यामुळे वैज्ञानिकांना बॉम्ब स्कॉड घालतात त्याप्रमाणे सुरक्षा कवच असणारे सूट घालून काम करावे लागत होते. त्यासाठी त्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक डिस्चार्ज आणि कॅंटामिनेशनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागत होता. आदित्य एल-१ उपग्रहासाठी काम करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना रोज एका अल्ट्रासॉनिक क्लीनिंग प्रक्रियेतून जावे लागत होते.
हॉस्पिटलमधील आयसीयूपेक्षाही एक लाख पटींनी ठेवली जात होती स्वच्छता
आदित्य एल-१ उपग्रहासाठी काम करणारे वैज्ञानिक रोज अशी विशेष प्रकारची खबरदारी घेत होते. एका क्लीन रूममध्ये या उपकरणाची निर्मिती करण्यात आली. त्यातील प्रत्येक भाग व्यवस्थितरीत्या बसवताना स्वच्छतेबाबत पूर्ण काळजी घेतली गेली. एखाद्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या आयसीयूपेक्षाही एक लाख पटींनी स्वच्छ अशी ही रूम होती. त्यावेळी वैज्ञानिकांनी प्रत्येकी सहा तासांच्या शिफ्टमध्ये काम केले.
त्यामुळे वैज्ञानिकांना कोणत्याही प्रकारचा परफ्युम, डिओ, सेंट वापरण्यास सक्त मनाई होती. विशेष म्हणजे मेडिकल स्प्रे वापरणेही टाळले गेले. कारण- या गोष्टींमधील एक कणही VELC उपकरणासाठी घातक ठरणार होता. या उपकरणात वापरण्यात आलेले स्क्रूदेखील अल्ट्रासॉनिक पद्धतीने स्वच्छ करण्यात आले होते.