आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणींमध्ये रडणारे काही जण असतात तर काहीजण या अडचणींना हसत सामोरे जातात. अनेक संकटे झेलत आणि कष्ट करत आनंदी असतात. आयुष्यातील सर्वात गंभीर प्रसंगीही काहींना मिळणारा छोटा छोटा आनंद जगण्याची प्रेरणा देतो. अशाच एका मोठ्या संटकातून वाचलेल्या अफगानिस्तानमधील एका मुलाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे.

अफगाणिस्तानमधील लोगर येथील एका भूसुरुंगावर पाय ठेवल्याने तेथील अहमद या लहान मुलाने एक पाय गमावला. सात ते आठ वर्षाच्या अहमदवर शस्त्रक्रिया करुन त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसच्या (आयसीआरसी) अफगाणिस्तानमधील आरोग्य केंद्रावर अहमदवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. कृत्रिम पाय लावल्यानंतर अहमदला पुन्हा दोन पायांवर उभे राहता आले. इतक्या मोठ्या संकटामधून जीव वाचल्यानंतर पुन्हा दोन्ही पायांवर उभं राहता आल्याने अहमद खूपच खूष दिसत होता. याच आनंदामध्ये त्याने कृत्रिम पाय लावल्यानंतर आरोग्य केंद्रामध्येच डान्स केला. अफगाणिस्तानमधील रोया मुसवायी या तरुणीने ट्विटवरुन या मुलाचा नाचतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये रोया म्हणते, ‘अहमदला आयसीआरसीच्या केंद्रात कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत. हा कृत्रिम पाय लावल्यानंतर या मुलाने नाचून आनंद व्यक्त केला. एका भूसुरुंगावर पाय पडल्याने त्याने एक पाय गमावला. त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलले आणि आता तो अशाप्रकारे आनंद साजरा करत आहे.’

दोन दिवसांमध्ये या व्हिडिओला १० हजार ७०० हून अधिक रिट्वीटस आणि ३५ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर ८ लाख ९० हजार लोकांनी हा व्हिडिओ ट्विटवरुन पाहिला आहे. छोट्या छोट्या दु:खांवरुन खचून जाण्यापेक्षा संकटांना हसत समाेरे जा असाच संदेश हा चिमुकला देत असल्याचं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader