भारतीयच नाही तर जगभरातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं मुन्नार सध्या जांभळ्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे. नजर जाईल तिथपर्यंत निर्सगाच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालेलं हे सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत आहे. तब्बल बार वर्षांनी मुन्नारच्या हिरव्यागार टेकड्यांवर नीलाकुरिंजीला बहर आला आहे. त्यामुळे धुक्यात हरवलेल्या या गुलाबी टेकड्या पाहण्यासाठी आता हजारो पर्यटक ‘देवभूमी’ची वाट धरत आहे.
जुलै अखेरीस नीलाकुरिंजीची जांभळी गुलाबी फुलं टेकड्यांवर दिसू लागली. केरळात आढळणारी नीलाकुरिंजी अत्यंत दुर्मिळ आहे. बारा वर्षांनी एकदाच नीलाकुरिंजीला बहार येतो. त्यानंतर ही रोपटी मरून जातात. पुन्हा बियांपासून नवीन रोपटी उगवून तिला फुलं येण्यास बारा वर्षे लागतात. त्यामुळे ही फुलं पाहण्याचा योग येणं दुर्मिळचं. २००६ मध्ये मुन्नार टेकड्यांवर नीलाकुरिंजीला बहार आला होता. पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासोबतच ही फुलझाडं, फुलपाखरं आणि मधमाशांसाठीही तितकीच उपयुक्त आहेत. त्यामुळे या फुलांबरोबरच विविध प्राजातीची रंगीबेरंगी फुलपाखरंही पाहायला मिळतात.
आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये नीलाकुरिंजीच्या ४५० विविध प्रजाती आढळतात. त्यातल्या १४६ प्रजाती या भारतात आहेत तर तब्बल ४३ या फक्त देवभूमीत म्हणजे केरळात आढळतात.
कधी पाहता येईल नीलाकुरिंजीचा हा बहर?
जुलै महिन्याअखेरीपासून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत
कुठे पाहता येणार ही फुलं?
कोचीपासून पाच तासांच्या अंतरावर असलेल्या कोविलुर, राजमाला, एराविकुलम नॅशनल पार्क येथे सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत पर्यटकांना निसर्गाची ही किमया पाहता येईल. या ठिकाणी भारतीय पर्यटकांकडून १२० रुपये इतकं प्रवेश शुल्क आकारलं जाईल.
जवळचं रेल्वेस्थानक- अंगामलय
जवळचं विमानतळ- कोची