गुजरातमधील एका दाम्पत्याला सतरा अपत्य झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचे शहाणपण सुचल्याची घटना समोर आली आहे. दाहुद जिल्ह्यातील अदिवासी भागातील हे दाम्पत्य एक मुलगा असताना आणखी एक मुलगा व्हावा, या विचाराने कुटुंब नियोजनाकडे दुर्लक्ष करत होते. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, सतराव्या अपत्यानंतर अखेर ४४ वर्षीय रमसिनने आपल्या पत्नीची कुटुंब नियोजन शस्रक्रिया केली आहे. रमसिनची पत्नी कन्नू हिने १६ व्या मुलीला सप्टेंबर २०१५ मध्ये जन्म दिला होता. रमसिनला आपल्या मुलांचा वाढदिवस देखील लक्षात नसतो. एवढेत नव्हे तर या दाम्पत्याने आपल्या नव्या अपत्याचे अजून नामकरण देखील केलेले नाही. २०१३ मध्ये रमसिनला एकुलता एक मुलगा झाला होता. या मुलाचे नाव विजय असे आहे. एक मुलगा असताना आपल्या मुलींची जबाबदारी सांभाळण्यासाठी आणखी एक मुलगा हवा असे वाटू लागले. अशी माहिती खुद्द रमसिने टाईम्सला दिलेल्या मुलाखतीवेळी दिली.
पहिल्यांदा या पती पत्नी दोघांना त्यांची देखरेख करण्यासाठी मुलगा व्हावा होता. पण एक मुलगा आणि अन्य मुली असे चित्र निर्माण झाल्यामुळे या दोघांनी मिळून आणखी एक मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. अखेर साळाव्या मुलीनंतर त्यांना दुसऱ्या पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. रमसिनचे कुटुंब एका मातीच्या घरामध्ये राहते. अल्पशा शेतीमध्ये मका आणि गहू याचे उत्पादन घेणाऱ्या रमसिनला गावातील लोकांनी कुटुंब नियोजनाबद्दल बऱ्याचदा समजावण्याचा प्रयत्न केला. आताच्या घडीला मुलांच्या शिक्षणच नव्हे तर पालन पोषण करणे देखील कठिण असल्याचे गावकऱ्यांनी त्याला सुनावले. अखेर १७ व्या अपत्याला जन्म दिल्यानंतर दाम्पत्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आर्थिक परिस्थिती बेताची असताना मुलगा व्हावा, यासाठी या दांम्पत्यांनी कुटुंब मोठे केले. रमसिनच्या दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर दोघींची लग्ने झाली आहेत. दोन मुलींना त्याने कामासाठी राजकोटला पाठविले आहे. कुटुंबाचा गाडा रेटण्यासाठी रमशिनची पत्नी देखील त्याला हातभार लावते.