राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेविषयी खूप चर्चा रंगतेय. अगदी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासून ते गल्लीबोळांतही या योजनेविषयी लोक चर्चा करताना दिसत आहेत. महिलांसाठी फायदेशीर असलेली ही योजना यापूर्वीच मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण, एका व्यक्तीला या योजनेमुळे एक भलताच फायदा झाला आहे. या व्यक्तीला पळून गेलेल्या पत्नीचा शोध लागला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ते कसे काय? तर हे जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील मेहगावमधील सुनील शर्मा यांची पत्नी ५३ दिवसांपासून ( २ मे २०२४) अचानक गायब झाली होती. सुनील यांनी पत्नीचा खूप शोध घेतला; मात्र तिच्याबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी त्याने मेहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ४ मे रोजी कतरौल गावाजवळील शेतात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तो मृतदेह पत्नी ज्योतीचा नसल्याचे सुनील यांना वाटत होते; मात्र पत्नीच्या माहेरच्या लोकांनी तो मृतदेह ज्योतीचाच असल्याचे म्हटले. यावेळी सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ज्योतीच्या माहेरच्यांनी खुनाचा आरोप केला. शेवटी सासरच्यांच्या दबावामुळे सुनील शर्मा यांनी उत्तरीय तपासणीनंतर ताब्यात मिळालेल्य मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर पोलिसांनी सुनील याला पत्नीच्या हत्येसंबंधात ताब्यात घेऊन, त्याची चौकशी केली; मात्र तो आपण कोणतीही हत्या केली नसल्याचे पोलिसांना वारंवार सांगत होता.

पण, त्यानंतरही पोलिसांनी सुनील आणि त्याच्या कुटुंबीयांच्या चौकशीचे सत्र सुरूच ठेवले होते. सुनील पोलिसांना टाळून कसेबसे दिवस काढत होता. याचदरम्यान तो एक दिवस अचानक बँकेत पैसे काढण्यासाठी म्हणून गेला. यावेळी त्याला समजले की, ज्योतीच्या बँक अकाउंटमधून २,७०० रुपये काढण्यात आले आहेत. याबाबत बँकेकडे विचारणा केली असता, बँकेने त्याला ‘लाडकी बहीण’ योजनेची ही रक्कम असल्याचे सांगितले.

ही रक्कम उत्तर प्रदेशातील मथुरा आणि नोएडा येथून काढण्यात आली होती. सुनीलने सांगितले की, त्याने बँक मॅनेजरला ही रक्कम कशी काढली याची माहिती विचारली असता, बँक मॅनेजरने पोलिसांकडे रीतसर तक्रार केल्यानंतर माहिती देऊ, असे सांगितले. त्यानंतर त्याने मेहगाव पोलिस ठाणे गाठून, तेथील प्रभारी आशुतोष शर्मा यांना सर्व माहिती दिली.

ही सर्व घटना पाहता, मेहगाव पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी बँकेकडून तपशील मिळवला. त्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करताना पोलिसांना नोएडातून एका किऑस्क सेंटरची माहिती मिळाली; जिथून सुनीलच्या पत्नीने आधार कार्ड आणि फिंगरप्रिंटच्या आधारे ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम काढली होती. जेव्हा पोलिस नोएडाला पोहोचले तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट पाहिली ती म्हणजे किऑस्क सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज; ज्यात सुनीलची पत्नी ज्योती काही तरुणांबरोबर दिसली.

ज्योतीने बँकेतून २,७५० रुपये काढले आणि ती रक्कम एका सहकारी तरुणाला देताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्यानंतर सासरच्या घरातून बेपत्ता झालेली ज्योती नोएडात असल्याचे अगदी स्पष्ट झाले. पोलिसांनी नोएडामध्ये शोध सुरू केला तेव्हा ज्योती पदपथावरून चालत असताना सापडली. त्यानंतर पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेतले आणि एसडीएम न्यायालयात हजर केले. यावेळी तिने मी स्वत:च्या इच्छेने घरातून पळून गेल्याचे सांगितले. मग पोलिसांनी ज्योतीला पकडून मेहगावला आणले आणि तिच्या मामाच्या ताब्यात दिले.

आता पोलिसांसमोर प्रश्न उभा राहिला आहे की, सुनीलने ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तो जळालेल्या अवस्थेतील मृतदेह कोणाचा होता?