UP Helicopter Wedding Baraat: भारतात थाटामाटानं लग्न करण्याचं प्रमाण जरा जास्तच आहे. इथे लग्नसोहळा एका उत्सवासारखा साजरा केला जातो. गाव-शहरांत लग्नात अनेकदा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता, कर्ज काढून पाण्यासारखा पैसा ओतला जातो. भारतात विविध चाली-रीतींनुसार हा लग्नसोहळा पार पडत असतो.
भारताचे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा (Anant Ambani Wedding) लग्नसोहळा नुकताच पार पडला. या भव्य लग्नसोहळ्याची चर्चा वर्षभरापासून सुरू होती. परंतु, आता अंबानीं नव्हे, तर या उत्तर प्रदेशातील एका गावातल्या या लग्नसोहळ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. सोशल मीडियावर या लग्नाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतायत. पण. या लग्नात एवढं खास आहे तरी काय जाणून घेऊ.
उत्तर प्रदेशात असलेल्या बागपत जिल्ह्यातील माविकलान गावामधील एका लग्नसोहळ्यानं सगळ्यांनाच अचंबित करून सोडलं आहे. या लग्नात वरात घेऊन आलेल्या नवरदेवानं नववधूसह चक्क हेलिकॉप्टरनं (UP Helicopter Wedding Baraat) गावात एन्ट्री केली. हे बघून गावकरी आश्चर्यचकित झाले आणि त्या ठिकाणी गर्दी जमली.
गाझियाबाद इंद्रापुरी या गावात राहणारा वर वीरेंद्र एक दूध व्यापारी आहे. लग्नासाठी वीरेंद्र माविकलान येथे हेलिकॉप्टरनं आला; जिथे त्याचं लग्न याच गावात राहणाऱ्या प्रतीक्षाशी होणार होतं. आजूबाजूच्या गावांतील लोकही कुतूहलास्तव या लग्नसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तिथे आले होते. त्यामुळे लग्नस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
रीतीरिवाजानुसार हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवविवाहित जोडप्याची वरात हेलिकॉप्टरमधून माविकलान गावातून निघाली. ते आगळेवेगळे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी हेलिकॉप्टरजवळ गर्दी केली होती. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
गावप्रमुख दीपक कुमार (जे प्रतीक्षाचे मामादेखील आहेत) यांनी सांगितले की, प्रशासनाने आधीच सर्व आवश्यक परवानग्या दिल्या होत्या. त्यांनी असेही सांगितले की, वधूला निरोप देण्यासाठी वराने हेलिकॉप्टर (UP Helicopter Wedding Baraat) घेऊन त्यांच्या गावात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्व विधी उत्तम प्रकारे पार पडले आणि अधिकाऱ्यांनीही पूर्ण सहकार्य केले. या लग्नात एक दिवसासाठी वर जणू सेलिब्रिटी बनल्यासारखाच वाटत होता. गावातील लोकांना सांभाळणं अवघड झालं होतं. कारण- गावकऱ्यांना त्याच्यासोबत फोटो काढायचे होते, असंही ते म्हणाले.
दरम्यान, याआधीही अनेकदा हेलिकॉप्टरमधून अशा प्रकारची वरात निघाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.