मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजपा पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. या निकालांमुळे राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. महत्वाची बाब म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा पुढे न करता निवडणुकीच्या प्रचारात ‘मोदी की गॅरेंटी है’ अशा शब्दांत साद घालणाऱ्या पंतप्रधानांना मतदारांनीही दाद दिली. त्यामुळे आजही देशात मोदी लाट असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तिन्ही राज्यात पंतप्रधान मोदी निवडणुकीचा प्रमुख चेहरा होते. अशा परिस्थितीत बाकीचे नेते आणि जनता प्रचंड बहुमताचे श्रेय पंतप्रधान मोदींना देत आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला मोदींचा व्हिडिओ निवडणूक प्रचारातील नव्हे तर त्यांनी लोकसभेत दिलेल्या एका भाषणाचा आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी लोकसभेत बसलेल्या विरोधी सदस्यांना उद्देशून बोलताना दिसत आहेत. व्हिडीओत ते विरोधकांना चोख प्रत्युत्तर देताना बोलत होते. त्यावेळीच्या भाषणातील काही भाग भाजपा समर्थक व्हायरल करत आहेत. तर मोदी या व्हिडीओमध्ये नेमकं काय बोलले होते ते जाणून घेऊया.

हेही पाहा- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल, भाजपाचे नेते म्हणतायत, “राहुलजींची भविष्यवाणी…”

“एक अकेला कितनों को भारी पड रहा है…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, “आदरणीय सभापतीजी, देश पाहत आहे, एक व्यक्ती कित्येकांवर भारी पडत आहे.” ते व्हिडीओत पुढे म्हणतात की, मी देशासाठी जगतो आणि देशासाठी काहीतरी करण्यासाठी बाहेर पडलो आहे. हे लोक राजकारणाचा खेळ खेळणारे आहेत. त्यांच्यामध्ये ती हिंमत नाही. ते पळून जाण्याचा मार्ग शोधत आहेत. हा व्हिडीओ सध्या भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

दरम्यान, देशाच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीत भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मोठे नेते जमले होते. यावेळी विजयावर प्रतिक्रिया देताना यांनी काँग्रेस नेत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्याचा आरोप जे. पी. नड्डा यांनी केला. जे. पी. नड्डा म्हणाले, “या निवडणुकींच्या निकालांनी हा संदेश दिला आहे की, मोदीच देशाला मजबूत करू शकतात. निवडणुकीच्या निकालाने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, गरीब, वंचित, पीडित, शोषित, आदिवासी यांना मोदीच मुख्य प्रवाहात आणू शकतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After bjps victory in assembly elections 2023 pm narendra modis that video went viral on social media jap