Chandrayaan-3 Landed: चांद्रयान-3 चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. यासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत रशिया, अमेरिका आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला आहे. त्याच वेळी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील पहिला देश बनला आहे. दरम्यान यानंतर सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले, कुणी म्हंटलं आता खरंच आपण चंद्रावर आहोत तर कुणी म्हंटलं आता तुमच्या प्रियजनांना खरंच चंद्र आणून द्या. तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून असं कित्येक तरुण आपल्या प्रेयसीला सांगतात. आपल्या ‘चांद का टुकडा’वर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी प्रियकर असं म्हणतो खरं. पण नुकतंच एका व्यक्तीने मात्र पत्नीला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क चंद्रावरची जमीन विकत घेतली आहे.
किती किंमतीला विकत घेतली चंद्रावर जमीन?
पश्चिम बंगालमधील झारग्राम जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तिच्या वाढदिवसानिमित्त तिला चंद्रावर एक जमीनीचा तुकडा भेट दिला आहे. चंद्रावर एक एकर जमीन १० हजार रुपयांना विकत घेतल्याचे संजय महातोने सांगितले आहे. झालं असं की, त्यानं लग्न करण्यापूर्वी आपल्या पत्नीला तुझ्यासाठी चंद्र आणण्याचे वचन दिले होते. त्यानंतर नुकतंच भारताच्या यशस्वी चांद्रयान-३ मोहिमेनंतर अशी भेटवस्तू खरेदी करण्याची प्रेरणा मिळाल्याचे महतो म्हणाले. त्यामुळे पत्नीला दिलेले वचन पूर्ण करण्याचे त्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असा त्याला विश्वास मिळाला.
लग्नाआधी दिलं होतं वचन
“मी आणि माझ्या पत्नीने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये लग्न केले त्यावेळी मी तिला चंद्र आणण्याचे वचन दिले होते. मात्र त्यावेळी मी ते वचन पाळू शकलो नाही. पण आता, आमच्या लग्नानंतर तिच्या पहिल्या वाढदिवशी, तिला चंद्रावर प्लॉट गिफ्ट करु असे माझ्या मनात आले असं संजय सांगतो.
मित्राच्या मदतीने त्यांनी लुना सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जमीन खरेदी केली. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे एक वर्ष लागले. “मी तिच्यासाठी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे,” असे संजय म्हणाला. त्याच्या हातात एक नोंदणी कागद होता ज्यावर ‘चांद्र संपत्तीसाठी नोंदणीकृत दावा आणि करार’ असे लिहिलेले आहे.
हेही वाचा >> गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’च्या आगमनाची तारीख ठरली, पण मुंबई पोलिसांनी केलं ‘हे’ मोठं आवाहन
त्या पैशातून आणखी काही आणता आले असते का, असे विचारले असता संजय म्हणतो, “हो, मी आणू शकलो असतो, पण चंद्राचं आपल्या सगळ्यांच्या हृदयात विशेष स्थान आहे. त्यामुळे लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या वाढदिवशी यापेक्षा मोठं गिफ्ट असू शकत नाही.”