कुटुंबातील कार्यक्रम असो वा कोणताही समारंभ असो या वेळी प्रत्येक आनंदाचा क्षण टिपण्यासाठी लोक फोटोग्राफर बोलावतात. जेणेकरून त्या क्षणाच्या आठवणी वर्षानुवर्षे जतन करता येतील. यात लग्नसोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी खास असतो. यामुळे लग्नसोहळ्यात फोटोग्राफर हा असतोच. काही जोडपी अनेकदा फोटोग्राफरच्या कामावर इतकी खूश होतात की ती घरातील कोणताही कार्यक्रम असो तेव्हा त्याच फोटोग्राफरला कॉल करतात. मात्र एका महिलेने लग्नानंतर चार वर्षांनी तिच्या वेडिंग फोटोग्राफरला कॉल केला. पण हा कॉल वेडिंग फोटोग्राफी आवडली म्हणून नाही तर लग्नात फोटोग्राफीसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी होता. तुम्हाला महिलेची ही मागणी थोडी अजब वाटली असेल पण खरेच तिने फोटोग्राफरकडून पैसे परत मागितले आहेत. यावर महिलेने म्हटले की, आता माझा घटस्फोट झाला आहे आणि तू लग्नात घेतलेले फोटोग्राफीचे सर्व पैसे परत कर. सध्या संबंधित महिला आणि फोटोग्राफरमधील वॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुरुवातीला फोटोग्राफरला महिलेचे बोलणे विनोद वाटत होता. मात्र नंतर महिला गंभीर पद्धतीने बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. या वेळी पतीसोबत आता कोणतेही संबंध नसल्यामुळे वेडिंग फोटोग्राफीचे पैसे परत मागू शकते, असे ती महिला वारंवार सांगत होती. मात्र फोटोग्राफरने तिची मागणी फेटाळून लावली. यानंतर वॉट्सॲपवरील महिलेसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट त्याने ट्विटरवर शेअर केले. फोटोग्राफरचे हे ट्वीट आता खूप व्हायरल होत आहे. लान्स रोमियो फोटोग्राफी या ट्विटर अकाऊंटवरून हे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, मी शपथ घेतो, माझे जीवन आता असा एक चित्रपट झाला आहे जो तुम्ही कधी बनवू शकत नाही.
फोटोंची आता मला काही गरज नाही, महिलेचे विधान
फोटोग्राफरने शेअर केलेल्या वॉट्सॲप चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये महिलेने असे म्हटले आहे की, मला माहीत नाही तुम्हाला मी आठवते की नाही ते. पण तुम्ही २०१९ मध्ये डरबनमध्ये माझ्या लग्नात माझ्यासाठी फोटोशूट केले होते, पण आता माझा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे त्या फोटोंची आता मला किंवा माझ्या घटस्फोटित पतीला काही गरज नाही. तुम्हाला पाहिजे तर ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुम्ही खूप छान काम केले पण ते सगळे आता व्यर्थ गेले आहे. त्यामुळे त्या वेळी दिलेले फोटोग्राफीचे पैसे तुम्ही परत करा; कारण आम्हाला आता या फोटोंची काही गरज नाही.
यावर फोटोग्राफरने विचारले की, हा विनोद होता का? पण महिलेने ठणकावून सांगितले की, हा विनोद नाही. यानंतर फोटोग्राफरने पैसे परत देण्यास नकार देत म्हटले की, हे फोटो मी कोणत्याही प्रकारे नष्ट करू शकत नाही.
पूर्वपतीने मागितली फोटोग्राफरची माफी
घटस्फोटित महिलेने या प्रकरणी फोटोग्राफरला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. पण यानंतरही फोटोग्राफर तिची मागणी मान्य करण्यास तयार झाला नाही. पण हे चॅट व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या पूर्वपतीने फोटोग्राफरशी संपर्क केला आणि फोटोग्राफरची माफी मागितली. या वेळी नाव न छापण्याच्या अटीवर तो फोटोग्राफरला म्हणाला की, मी तुमचे स्क्रीनशॉटमधील चॅट्स वाचले. तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे.
फोटोग्राफरने ही पोस्ट ११ एप्रिल रोजी शेअर केली होती, जी आतापर्यंत ३.८ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. यावर काही युजर्सने हा एक प्रँक असल्याचे म्हटले आहे. तर काही युजर्स असे कोण कसे करू शकते, असा सवाल उपस्थित करतायत. बहुतांश युजर्स पोस्टखाली हसण्याची इमोजी शेअर करीत आहेत.