चुंबन घेण्याच्या बहाण्याने पत्नीच्या जवळ गेलेल्या पतीने धारदार शस्त्राने पत्नीची जीभ कापून टाकली. अहमदाबादच्या जुहापूरा भागात बुधवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. जखमी महिलेने गुरुवारी वेजालपूर पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. महिलेला तात्काळ सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
जखमी महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. २००४ साली तिचे लग्न झाले. पण पती बरोबर मतभेद झाल्यानंतर लग्नानंतर पाच वर्षातच घटस्फोट झाला. २४ मार्च २०१८ रोजी तिने जुहापूरा येथे राहणाऱ्या व्यक्तीबरोबर दुसरे लग्न केले. त्या माणसाची आधीच दोन विवाह झाले होते. लग्नानंतर नवरा अजूनही दुसरी पत्नी आणि तिच्या मुलाबरोबर राहत असल्याचे तिला समजले.
पीडित महिलेने यावर आक्षेप घेतल्यानंतर नवऱ्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. नवरा काहीच काम करत नसल्यामुळे मी त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची किंवा व्यवसाय सुरु करण्याची विनंती केली. मी नोकरीचा तगादा मागे लागवल्यामुळे तो मला सतत मारहाण करायचा असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. मागच्या आठवडयात मी त्याला पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. पण त्यानंतर आमच्यात समेट झाला.
बुधवारी रात्री अकराच्या सुमारास नवरा प्रेमाने माझ्याजवळ आला. आधी त्याने चुंबन घेतले. नंतर काही समजायच्या आत त्याने धारदार शस्त्राने माझी जीभ कापली असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. नवऱ्याने नंतर बाहेरुन रुम लॉक केली व पळून गेला. महिलेने तिच्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन स्वत:ची परिस्थिती दाखवली. महिलेची बहिण तिथे पोहोचली. तिने शेजाऱ्यांकडून दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला व महिलेला रुग्णालयात दाखल केले. आरोपी फरार आहे.