Audi Chaiwala Viral Video: आपल्या देशामध्ये बहुतांश लोक हे चहाप्रेमी आहेत. चहा प्यायल्याशिवाय सकाळ होत नाही असे अनेकजण म्हणत असतात. दिवसात ठराविक कप चहा घेतला नाही, तर काम करताना मन लागत नाही असेही लोक पाहायला मिळतात. आपल्याकडच्या लोकांना लागलेले चहाचे वेड ओळखून बऱ्याचजणांनी चहाविक्रीचा व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचे पाहायला मिळते. सध्या देशामध्ये एमबीए चायवाला, इंजिनियर चायवाला असे असंख्य चायवाल्यांचा सुळसुळाट झाल्याचे दिसते. चहा विकणाऱ्या या चायवाल्यांच्या यादीत आणखी एक नाव जोडले जात आहे. ते नाव म्हणजे Audi Chaiwala.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण ऑडी कारच्या मागे चहाचा स्टॉल लावून लोकांना चहा विकत असल्याचे दिसते. स्टायलिश कपडे, महागडे शूज घालून हा तरुण चहा बनवून लोकांना सर्व्ह करत आहे. ग्राहकदेखील त्याने बनवलेला चहा आवडीने पित आहेत. ऑडी कारच्या डिक्कीमध्ये थर्मास, चहाचे कप व अन्य सामान ठेवल्याचे तुम्ही पाहू शकता. शेवटी तो तरुण व्हिडीओमधील महागडी गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळते. @sachkadwahai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमधून हा व्हिडीओ मुंबईच्या लोखंडवाला भागातील आहे असे लक्षात येते.
या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये देत आहेत. एका यूजरने ‘काही नाही भाऊ.. कार EMI वर घेतली आहे’ असे गमतीने म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने त्याच्या मित्राला टॅग करत ‘या व्यवसायात खूप स्कोप आहे..चला आपण पण चहा विकायला सुरुवात करुया’ अशी कमेंट केली आहे. काहीजणांनी ‘यातून पेट्रोलचा खर्च निघत असावा’ असे म्हटले आहे. व्हिडीओ ऑडी टी स्टॉल हा अमित कश्यप आणि मन्नू शर्मा यांच्या मालकीचा आहे. त्यांनी याला OneDriveTea (OD Tea) असे नाव दिले आहे.